नवी दिल्ली – येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये कोरोना विषाणूमुळे एका ११ वर्षाच्या मुलीच्या मेंदूतल्या मज्जातंतूवर दुष्परिमाण होत असल्याची प्रथम घटना घडकीस आली आहे. यामुळे मुलीच्या दृष्टीवरही परिणाम झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टर तिच्या तब्येतीचा अहवाल तयार करत असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे ११ वर्षांच्या मुलीमध्ये तीव्र डिमिलिनेटिंग सिंड्रोम (एडीएस) झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे मुलांमध्ये आढळून आलेली ही पहिलीच घटना आहे. मज्जातंतू मायलिन नावाच्या संरक्षक थराने व्यापलेल्या असतात. स्नायूंच्या हालचाली, इंद्रिय, मूत्राशय आणि आतड्यांसंबंधी हालचाली इ. सारख्या न्यूरोलॉजिकल परिणाम दिसून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कोरोनाचा विषाणू मेंदू आणि फुफ्फुसांवर देखील आघात करत असल्याने याप्रकरणी लवकरच अहवाल प्रसिद्ध करणार असल्याची माहिती एम्सच्या बाल न्यूरोलॉजी विभागातील बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेफाली गुलाटी यांनी दिली आहे. डॉक्टर गुलाटी यांच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू होते. इम्यूनोथेरपीमुळे तिची प्रकृती सुधारली असून तीला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.