डांगसौंदाणे (ता. सटाणा) – बागलाण मधील ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोमवारी (१४ डिसेंबर) आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली आहे.
बागलाण तालुक्यात एकूण १३१ ग्रामपंचायती असुन यापैकी ४९ ग्रामपंचायती ह्या पेसा क्षेत्रातील असल्याने या ठिकाणी अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी सरपंच पद कायम राखीव असल्याने उर्वरित ८२ ग्रामपंचायतीच्या २०२० ते २०२५ या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी १४ डिसेंबर रोजी बागलाण पंचायत समितीच्या भिकन जयाजी सभागृहात तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. ८२ गावातील बहुतांश जनतेने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवहान तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी केले आहे. सकाळी ११ वाजता या आरक्षण सोडतीला सुरवात करण्यात येणार असुन तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक असल्याने सध्या स्थानिक पुढाऱ्यांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे आरक्षण सोडती कडे लक्ष लागुन आहे.