निलेश गौतम, डांगसौंदाणे
बागलाण पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी उद्या दिनांक २२ रोजी निवडणूक होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर बागलाण पंचायत समितीत राष्ट्रवादी ,काँग्रेस, व सेनेच्या माध्यमातून महाविकासआघाडीच्या राष्ट्रवादी पक्ष्याच्या इंदुबाई ढुमसे या सभापती आहेत तर उपसभापती सेनेचे कान्हू अहिरे हे होते.
मधल्या काळात उपसभापती आहिरे यांच्यावर सत्ताधारी गटातील काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करत उपसभापती आहिरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता. उपसभापती अहिरे यांनी पंचायत समितीतील सदस्यांचा कौल समजून घेत राजीनामा देऊन थांबून घेणे पसंत केले.
असे आहे समीकरण
बागलाण पंचायत समितीत १४ सदस्यांमध्ये भाजपाकडे ७, राष्ट्रवादीकडे ४, काँग्रेसकडे २, अपक्ष १ तर उपसभापती राहिलेले कान्हू अहिरे हे सेनेचे एकमेव सदस्य आहेत. सध्या राष्ट्रवादीचे इंदुबाई ढुमसे यांच्या सभापतीपदावर कुठलेही गडांतर न आणता भाजपाच्या आराई गणातील ज्योतीताई अहिरे या उपसभापती पदासाठी इच्छुक आहेत.
चमत्कार होणार
पंचायत समितीचे बहुसंख्य सदस्य हे दोन दिवसापूर्वीच अज्ञात ठिकाणी सहलीला निघून गेल्याची चर्चा आहे. उद्या होणाऱ्या उपसभापती निवडणुकीत काही चमत्कार होतो की, यापूर्वी दोनदा पदाला हुलकावणी दिलेल्या ज्योतीताई अहिरे या उपसभापती पदी विराजमान होतात याकडे तालुका वासियांचे लक्ष लागून आहे.