बागलाण – तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या चार दिवसापासून अवकाळी ने कहर केला आहे. पश्चिम भागातील केरसाने ,दसाने, तळवाडे दिगर ,पठावे दिगर ,मोरकुरे ,सावरपाडा ,सह अन्य काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. या गारपिटीने या भागातील शेतकऱ्यांची सर्व शेत पिके हे क्षतीग्रस्त झाल्याने या भागातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपयाची नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी बागलाण च्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
चव्हाण यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत नुकतीच भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. पश्चिम भागात गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने या भागातील उन्हाळ कांदा ,कांदा बियाण्यांचे डोंगळे, नुकतीच लागवड झालेले टोमॅटो, मिरची, पपई, टरबूज, खरबूज, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार दोनशे कोटीहून अधिक चे नुकसान शेतकऱ्यांचे असून काढणीआलेला उन्हाळ कांदा हा जमिनीतच जमीनदोस्त होण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून अवकाळी चा फटका हा शेतकरी वर्गाला बसत असून यामुळे बागलाणचा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यात शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या वसुलीसाठी खंडित केल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मध्ये रोजच वाढ होत आहे. शेतातील शेत पिकांचे नुकसान पाहता सरकारने कुठल्या ही अटी व शर्ती न लावता सरसकट हेक्टरी 30 हजार रुपयांचे नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
महसूल व कृषी विभागाचे पंचनामे झाल्यावर निश्चित किती हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे याचा अंदाज येणार असून आपण लवकरच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले आहे.