निलेश गौतम
…..
डांगसौंदाणे – बागलाणच्या पश्चिम भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेत शिवारात काम करणाऱ्या शेतकरी शेजमजुरांना बिबट्याच्या दहशतीखाली काम करावे लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्याने उच्छाद मांडल्याने अनेक शेतक-यांच्या शेळ्या, पाळीव कुत्र्यावर बिबट्या डल्ला मारला आहे. रात्रपपाळीस शेततात काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होत असल्याने सध्या शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली काम करताना दिसून येत आहे. या भागातील ऊसाचे क्षेत्र तुटल्याने बिबट्याचा मुक्त वावर सुरू झाला आहे. अनेकांना सकाळी सकाळी शेत शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहे. काल मद्यरात्री गावाशेजारील संजय नानाजी सोनवणे यांच्या शेड मधील शेळीला बिबट्याने पकडले मात्र सोनवणे यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करीत बिबट्याला हुसकावून लावले. सोनवणे यांची शेळी मोठ्या प्रमाणावर जखमी झाली आहे. वनविभागाने या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे. सध्या बागलाण वनपरिक्षेत्राचा कार्यभार एका प्रभारी अधिकाऱ्याकडे आहे. या भागातील मुख्य वनमंडळ असलेल्या डांगसौंदाणे व ततानी परिमंडळातील वनपाल कर्मचारी हे स्थानिक न राहता आपल्या सोयीच्या ठिकाणी राहत आहेत. अनेक वेळा शेतकरी या कार्यालायत तक्रारी साठी जात असल्याने कुलूप बंद असलेले हे कार्यालय व कर्मचारी निवास्थान बंद दिसून येते. त्यामुळे नेमकी तक्रार कुठे करायची हाच प्रश्न पडत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून ऐकावयास मिळत असल्याने सध्या बागलांणच्या वनविभागचा कारभार चव्हाटयावर आला आहे.
.