निलेश गौतम, डांगसौदाणे (ता. सटाणा)
बागलाण तालुक्यातील करंजाडचे भूमीपूत्र तथा मविप्रचे संचालक डॉ. प्रशांत उदाराम देवरे यांनी राज्यातील पहिल्या पोलिस कोविड सेंटरचे प्रतिनिधित्व स्विकारत ही जबाबदारी लीलया पार पाडली आहे. यानिमित्त पुन्हा एकदा बागलाणचे नाव राज्याच्या आरोग्य विभागाच्या दफ्तरी नोंदले गेले आहे.
जगभर कोरोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह पोलिस अणि प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. अशातच अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी बाधित होत आहेत. काही जणांना यात आपला जीव ही गमवावा लागत आहे. या सर्व परिस्थितिशी लढताना पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी बाधित झालेच तर त्यांना पुरेसा अणि वेळेत उपचार मिळावा, यासाठी नाशिकचे नवनियुक्त पोलिस आयुक्त दिपक पांडे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या पोलिस कोविड सेंटर साकारण्यात आले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे ,मनापा आयुक्त कैलास जाधव,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर आदींच्या उपस्थितीत या सेंटरचे उदघाटन झाले आहे. अल्प कालावाधीत हे कोविड सेंटर अद्ययावत पद्धतीने सुरु करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने डॉ. देवरे यांच्याकडे दिली होती. डॉ. देवरे यांनी गेले १५ दिवस अहोरात्र काम करीत हे सेंटर साकारले आहे. हे पोलिस कोविड सेंटर कोरोना काळात आपल्यासाठी कायम ”सदरक्षणाय खलनिग्रहणाय” चे ब्रीद वाक्य घेऊन सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आशादयक ठरेल, यात शंका नाही.
माजी शिक्षण व आरोग्य सभापती, मविप्र संचालक तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे यांचे डॉ. प्रशांत हे चिरंजीव आहेत. त्यांचे मोठे बंधू शशिकांत देवरे बागलाणच्या सक्रीय राजकारणात असून सटाणा बाजार समितीचे ते माजी संचालक आहेत. डॉ प्रशांत देवरे हे सटाणा ग्रामीण रुग्णालय व डांगसौंदाणे ग्रामीण येथे १० वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ दौलतराव आहेर यांचे जवळचे असलेले डॉ. देवरे यांनी धुळे शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले आहे. डॉ. आहेर आरोग्यमंत्री असताना जे. जे. मध्ये नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी विशेष सेवा मिळावी म्हणून डॉ. देवरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या डॉ. देवरे हे नाशिक पोलिस मुख्यालयातील रुग्णालयाचे प्रमुख आहेत. मविप्र सरचिटणीस निलीमा पवार यांचे विश्वासू सहकारी संचालक म्हणूनही डॉ प्रशांत देवरे यांची ओळख आहे. सध्या ते मविप्रवर बागलाणचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
गिरणा गौरव, जीवन गौरव आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. देवरे अणि त्यांच्या टीमचे जिल्हा प्रशासनाने अणि राज्याच्या आरोग्य विभागाने घेतलेली दखल नक्कीच बागलाणवासियांचा अभिमान वाढविणारी आहे. याही पुढे अशीच समाजसेवा त्यांच्या हातून घडत राहो, हिच सादिच्छा.