नीलेश गौतम, डांगसौंदाणे, ता. बागलाण
तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील अश्विनी जाधव ही युवती सैन्य दलात दाखल झाली आहे. त्यामुळे सैन्यात जाणारी ती तालुक्यातील पहिली कृषीकन्या ठरली आहे.
अजमेर सौंदाणे येथील पुंडलिक लोटन जाधव यांच्या शेतकरी कुटुंबात २४ एप्रिल २००० रोजी जन्म झालेली अश्विनी जाधव लहानपणापासूनच खेळाडू वृत्तीची आहे. भारतीय सैन्य दलात दाखल होण्याची महत्वाकांक्षा ती बाळगून होती. पहिली ते बारावीचे शिक्षण गावातील जनता विद्यालयात तिने घेतले. त्यानंतर औरंगाबादच्या “गरुड़ झेप” या सैन्यदल प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत तिने प्रवेश घेतला. एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत शिलॉंग (मेघालय) येथील भारतीय लष्कराच्या पहिल्याच मुलाखतीत ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर सैन्य दलाच्या खडतर असे ६ महिन्यांचे प्राथमिक तर २ महिन्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण नागालँड मधील चोंगलोंग येथे तिने पूर्ण केले. आता ती 9 AR बटालियन मधील मेडिकल विभागात “रायफल मॅन” म्हणून दाखल झाली आहे.
अजमेर सौंदाणे हे छोटे गाव आहे. एक भाऊ आणि दोन बाहिणींमध्ये लहान असलेल्या अश्विनीने आपल्या कामगिरीने गावाचे नाव रोशन केले आहे. तसेच, भारतीय सैन्यदलात जाऊ इच्छिणाऱ्या युवतींसाठी अश्विनीने मोठा आदर्शही निर्माण केला आहे. तिच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.