नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. विशेषतः ब्राझील, युरोपमधील काही देश तसेच भारत, पाकिस्तान याबरोबर बांगलादेशातही कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. त्यामुळे बांगलादेश सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याभराचा देशव्यापी लॉकडाउन लागू केला आहे.
बांगलादेशात दिवसभरामध्ये कोरोना विषाणूची ६,८३० नवीन कोरोना रुग्ण प्रकरणे नोंदली गेली असून ती एका दिवसातील सर्वाधिक प्रकरणे आहेत. तसेच देशातील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या ६ लाख २४ हजार ५९४ वर पोहोचली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत नवीन मृत्यूंचे प्रमाण वाढून १५५ झाले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये देशातील साथीच्या आजारानंतरची ही सर्वाधिक नोंद आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. देशात केवळ आपत्कालीन सेवा सुरू आहेत.
दरम्यान, सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, लॉकडाऊन दरम्यान महत्वाचे कारखाने खुले असतील आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कामगार दोन -तीन पाळीत काम करू शकतात. या बंद दरम्यान प्रत्येक कार्यालय आणि कोर्ट बंद राहील, पण उद्योग आणि कंपन्या आपले काम सुरू ठेवतील. मात्र संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या भागातील सर्व सार्वजनिक समारंभांवर बंदी आहे.