इंडिया दर्पण EXCLUSIVE
मुंबई/नाशिक – केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण भारतातील आयटी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बहुराष्ट्रीय स्नायडर कंपनीची उपकंपनी असलेल्या आरआयबी सॉफ्टवेअर या कंपनीने नाशिकमधील विनजित टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, आरआयबीने त्यांची गुंतवणूक थेट १५ टक्क्यांवरुन ५१ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आगामी काळात ही कंपनी नाशिकमध्ये आणखी गुंतवणूक करण्याची चिन्हे आहेत.
कोरोनाच्या संकटाने जगभरात हाहाकार माजविला आहे. यामुळे प्रचंड मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मात्र, याच महामारीच्या काळात आयटी क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांमध्ये मोठा करार झाला आहे. जर्मनीतील आरआयबी सॉफ्टवेअर या कंपनीने नाशिकमधील विनजित टेक्नॉलॉजीज या कंपनीत गेल्या वर्षी १५ टक्के शेअर्स खरेदी करुन गुंतवणूक केली होती. विनजित टेक्नॉलॉजीज ही जगातील महत्त्वाच्या ५० इन्फोटेन्मेंट कंपन्यांमधीलच एक कंपनी आहे. कंपनीचे भारतासह जगभरात एकूण ८ कार्यालये आहेत. कंपनीची लोकप्रियता आणि वाढता व्यवसाय पाहता आरआयबी सॉफ्टवेअरने या कंपनीत आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीने विनजितमधील गुंतवणुकीचा हिस्सा थेट ५१ टक्क्यांवर नेला आहे. २०२१ मध्ये २४.५ टक्के आणि उर्वरीत २४.५ टक्के हिस्सा हा २०२२ मध्ये पूर्ण केला जाणार आहे. तसा करार दोन्ही कंपन्यांमध्ये झाला आहे. तशी माहिती विनजितचे संस्थापक अश्विन कंदोई यांनी ‘इंडिया दर्पण‘शी बोलताना दिली आहे.
कोरोनाच्या काळातच कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक बहुराष्ट्रीय कंपनीने नाशिकच्या आयटी कंपनीत केल्यामुळे जगभरातच मोठा संदेश गेला आहे. तसेच, या गुंतवणुकीमुळे विनजित कंपनी आणखी वेगाने विकास आणि संशोधनासह विविध पातळ्यांवर काम करणार आहे. त्यामुळे कंपनीचा विस्तार जगभरातील अनेक देशांमध्ये होऊ शकणार आहे. हा करार करताना आम्हाला मोठा आनंद होत आहे. आरआयबीने आमच्यावर दाखविलेला विश्वासच सारे काही सांगत असल्याचे कंदोई यांनी म्हटले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून विनजित ही अत्यंत यशस्वीरित्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे मुख्यालय नाशिक असून जगभरात अनेक मैलाचे दगड प्रस्थापित केले आहेत. अत्यंत नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणून कंपनीने मोठा नावलौकिक जागतिक बाजारात कमविला आहे. या गुंतवणुकीमुळे विनजित कंपनीचा विस्तार झपाट्याने होणार असून त्याचा फायदा नाशिकसह भारताच्या विकासावरही परिणाम करणार आहे.
दरम्यान, आरआयबी कंपनी नाशिकमध्ये आणखी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या आयटी उद्योगाला आणि चालना मिळणार आहे.