मनाली देवरे, नाशिक
आयपीएल मध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स दोन संघात अबुधाबीत लढत होईल. आयपीएलच्या आकडेवारीचा इतिहास असे सांगतो की आतापर्यंत या दोन संघांमध्ये २५ सामने झाले असून त्यापैकी फक्त ६ सामने शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला जिंकता आले आहेत. उर्वरीत १९ सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे. अर्थात, मागच्या म्हणजे २०१९ च्या सिझनचा विचार केला तर पहिल्या साखळी सामन्यात कोलकाता संघाने मुंबईवर मात केली होती हे याठिकाणी विसरून चालणार नाही.
मंगळवारी महेंद्रसिंग धोनीने सलग दुसऱ्यांदा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शारजात सायंकाळी हिरवळीवर दव पडत असल्याने ओलसर चेंडूने गोलंदाजी करणे सामन्याच्या शेवटी जड जाईल अशी शक्यता बाळगून धोनीने हा निर्णय घेतला खरा, परंतु तोच निर्णय अखेरीस त्याच्या अंगलट आला. धोनीला त्याच्या गोलंदाजांवर आत्मविश्वास आहे आणि त्यांच्याकडून कुठे चुक झालीच तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना समोर असलेले ‘टारगेट’ गाठण्याचा अनुभव आहे. परंतु, यातला एकही फंडा कामी आला नाही, आणि कागदावर कमकुवत समजल्या जाणाऱ्या राजस्थान राॕयल्स संघाने हा सामना १६ धावांनी जिंकून २ गुणांची कमाई केली. चेन्नईतर्फे मधल्या फळीत डुप्लेसीसने खिंड लढवली खरी, त्यानंतर वाॕटसन आणि खुद्द धोनीने देखील धावा केल्या, परंतु अखेरीस विजयाचे प्रयत्न दुर ठेवून नेट रनरेट कसा कमी करता येईल याकडेच चेन्नई सुपर किंग्जला लक्ष द्यावे लागले.