मनाली देवरे, नाशिक
………
शारजाह मैदानावर शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या ४१ व्या साखळी सामन्यात मुंबई इंडीयन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा १० गडी राखून मोठा पराभव केला. या पराभवामुळे बलाढय चेन्नई सुपर किंग्ज संघाचे या सिझनमधील पॅकअप देखील जवळजवळपास निश्चीत झाले.
आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा १० गडी राखून पराभव होण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जसाठी यावर्षीचा आयपीएल सिझन आता फक्त एक सोपस्कार म्हणून उरला आहे. या विजयाने माञ, पहिल्या दोन संघात स्थान मिळविण्याची मुंबई इंडियन्सची मोहीम यशस्वी केली आहे.
चेन्नईची फलंदाजी ढासळली
प्रथम फलंदाजी करतांना चेन्नई संघाची अवस्था फारच वाईट झाली. या संघाच्या अवघ्या २१ धावा झालेल्या असतांना ट़ेन्ट बोल्टच्या वेगवान मा–यासमोर आणि राहुल चहरच्या लेगस्पिनच्या तालावर निम्मा संघ डग आउटमध्ये परतला होता. चेन्न्ईला या सामन्यात विजयासाठी अनेक प्रयोग करून बघावे लागले. ऋतुराज गायकवाड आणि नारायण जगदीशन या दोन नव्या फलंदाजांना त्यांनी संधी दिली. परंतु हे दोन्ही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. इम्रान ताहीरला इतक्या दिवस प्रवासी खेळाडू म्हणून संघासोबत बसवून ठेवल्यानंतर या सामन्यात त्याला संधी दिली पंरतु, त्याची फिरकी गोलंदाजी देखील काही चमत्कार करू शकली नाही. एकटा सॅम करण हा अष्टपैलू खेळाडू ५२ धावा करू शकल्याने चेन्नईला किमान धावांची शंभरी तरी पार करता आली.
शुक्रवारच्या सामन्यातील पराभवाने चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची निराशा आणखीनच वाढवली. मुंबई विरूध्द विजय मिळाला असता तर कदाचित या सिझनमध्ये चेन्नईला स्वतःचे आव्हान जिवंत ठेवण्याची संधी मिळाली असती. परंतु, चेन्नई सुपर किंग्जकडून विजयासाठी कुठलेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून आले आणि रणांगण सोडावे लागतांना एकेकाळचा हा जिगरबाज संघ या परतीच्या सामन्यात पुर्णपणे हताश झालेला दिसून आला. जाणकारांच्या मते अजुनही या संघाला संधी आहे. परंतु त्यांच्यासाठी अवघे ३ सामने उरले असून हे तीनही सामने त्यांना मोठया फरकाने जिंकावे लागतील. मुंबईविरूध्द झालेला मोठा पराभव पहाता ही शक्यता धुसर झाली आहे.
सलामीच्या जोडीनेच पुर्ण केल्या धावा
चेन्नईच्या २० षटकातील ९ बाद ११४ या धावसंख्येचा पाठलाग करतांना मुंबई इंडीयन्सला फारशी मेहनत घ्यावीच लागली नाही. या सामन्यात रोहीत शर्मा फीट नसल्याने खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर कायरन पोलार्ड कडे मुंबईचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. क्विंटन डी कॉक(४६ धावा) आणि इशान किशन (६८ धावा) या दोन सलामीच्या फलंदाजानी हे आव्हान १३ व्या षटकातच पार करून दाखवले.
मुंबईची गोलंदाजीतली ताकद वाढली
मुंबईसाठी या सामन्यात गोलंदाजांची दिमाखदार ठरलेली कामगिरी यापुढच्या सामन्यांसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे. जसप्रीत बुमराह मुंबईतर्फे सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. आज हातात चेंडू पडल्यावर त्याने नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी केलीच, परंतु त्याआधी बोल्टने मैदानावर टाकलेली सुसाट गोलंदाजी मुंबई संघाची मोठी शक्ती ठरली. राहूल चहर याने देखील शारजा सारख्या छोटया मैदानावर चेन्नईच्या मातब्बर फलंदाजांना चढाई करण्याची संधी मिळू दिली नाही.
शुक्रवारची लढत
आयपीएलच्या चाहत्यांसाठी शनिवारची दिवस आहे डबल धमाका पॅकेजचा. पहिल्या चारमध्ये कोणकोणते संघ रहातील, याबाबतचे अस्पष्ट असे चिञ शनिवारी निकालानंतर दिसू शकेल. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द दिल्ली कॅपीटल्स यांच्यात अबुधाबीतून दुपारी ३.३० वाजता थेट बघायला मिळेल तर किंग्ज इलेव्हन पंजाब विरूध्द सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघाची दुबईतली लढत संध्याकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० वाजता सुरू होईल.