नवी दिल्ली – कोरोनाचे संकट काही कमी होताना दिसत नाही. आणि त्यात आता बर्ड फ्ल्यू ची भर पडली आहे. दिवसेंदिवस त्याचाही धोका वाढतो आहे. राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशासोबतच केरळमध्येही याचा धोका दिसतो आहे. या राज्यांमध्ये काही दिवसांत शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हा आजार केवळ पक्षीच नव्हे तर माणसांनाही होऊ शकतो. यामुळे काळजी घेणे फार आवश्यक आहे.
हा आजार कसा पसरतो?
बर्ड फ्लू एव्हीयन इन्फ्लुएन्झा (H5N1) या विषाणूमुळे होतो. हे व्हायरल इन्फेक्शन आहे. लागण झालेल्या पक्ष्यांच्या संपर्कात आल्यावर हा आजार होऊ शकतो. बर्ड फ्लू अनेक प्रकारचे असले तरी H5N1 हा असा व्हायरस आहे, ज्यामुळे मनुष्याला देखील या आजाराची लागण होते. हा आजार प्रामुख्याने जंगली बदकामुळे पसरतो. पाळीव कोंबड्याना देखील याची लागण झटकन होते. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांना याचा सर्वाधिक धोका आहे. हा आजार एवढा भयंकर आहे की, यामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.
बर्ड फ्लूची लक्षणे काय?
बर्ड फ्लू झाल्यास कफ, डायरिया, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, सांधेदुखी, नाक वाहणे, पोटदुखी आदी लक्षणे दिसतात.
कसा कराल बचाव
या आजारापासून वाचायचे असेल तर स्वच्छता सर्वात महत्त्वाची.
संक्रमित पोल्ट्री फार्म किंवा तेथे काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येणे टाळा.
पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्यांनी पीपीई किट घालायला हवे.
डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज घालायला हवेत.
यावर कोणतीही लस नाही. पण प्रतिबंधक उपाय म्हणून फ्लूची लस घेऊ शकता.