नवी दिल्ली – कोरोना पाठोपाठ आता बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव देशातील दहा राज्यात पसरला आहे. याशिवाय अनेक राज्यात पक्ष्यांच्या अचानक मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे बर्ड फ्लू विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय नियंत्रण कक्षाची स्थापना करून सर्व राज्यांना खबरदारी घेण्याची सूचना दिल्या आहेत. तर बर्ड फ्लू ग्रस्त राज्यांच्या देखरेखीसाठी विशेष पथके तयार केली आहेत. आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या दहा राज्यात पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर सात राज्यात बर्ड फ्लू विषाणूमुळे मृत्यूची नोंद झाली आहे.
केंद्रीय पशुधन व दुग्ध विभागाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासकांना संपर्क साधण्याचे व राज्यातील बर्ड फ्लू संभाव्य भागावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि दिल्लीमध्ये जलाशयांच्या भोवती कावळ्या आणि बदकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात कुक्कुटपालनात कोंबड्यांचे अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या सर्व राज्यांतील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२००६ मध्ये भारत बर्ड फ्लूपासून मुक्त झाला होता. त्यानंतर, स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे प्रथमच या विषाणूचे येथे आगमन झाले आहे.