नाशिक – बर्ड फ्लूचे संकट आल्यामुळे पोल्ट्री उद्योगावर मोठा आघात झाला असून गेल्या १५ दिवसात नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाचे तब्बल ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ अफवांमुळे हे नुकसान झाल्याची माहिती नाशिक पोल्ट्री असोसिएशनने दिली आहे.
असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कुक्कुटपालनामुळे नाशिक जिल्ह्यात गेल्या २२ वर्षांपासून चांगली भरभराट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात अंदाजे मांसळ कुक्कुटपालन ५००० फार्मची संख्या उत्पादन केले जाते. सरासरी १००० टन चिकनचे उत्पादन दररोज होते. त्यापैकी २०० टन चिकन नाशिकमध्ये खपते, ५०० टन चिकन मुंबईला विक्री होते तर २०० टन गुजरात व १०० टन मध्यप्रदेशात खपले जाते. नाशिक जिल्ह्यात अंड्यावरील १४४ लेअर फार्मची संख्या असून १४ लाख पक्ष्यांची संख्या असून दररोज अंडी उत्पादन १२ लाख आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात १० लाख अंड्यांचा खप होऊन २ लाख अंडी मुंबईला विक्री होतात. बॉयलर फार्मिंगवर ३५००० व लेअर फार्मिंगवर १५०० लोक प्रत्यक्षपणे या व्यवसायावर अवलंबून असून अप्रत्यक्षपणे १ लाख असे एकूण अंदाजे दीड लाख लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. मागील १५ दिवसांपासून अंदाजे ५० कोटी रुपयांचे नुकसान या व्यवसायाचे झालेले आहे.
शास्त्रीय पद्धतीने व्यवसाय
नाशिक जिल्ह्यात कुक्कुटपालन हे संपूर्णतः शास्त्रीय पध्दतीने होत असून तज्ज्ञ पशुवैद्यकांमार्फत त्यांचे संपूर्ण लसीकरण, आहार, आजार प्रतिबंधक व्यवस्थापन केले जाते. कुक्कुटपालकास दररोज तांत्रिक सल्ला मिळाल्यामुळे चांगल्याप्रकारे जैव सुरक्षिततेचे पालन केले जाते. देशी व गावठी पक्षी हे ग्रामीण भागात पाळले जातात. त्यांची निगा, मार्गदर्शन, लसीकरण आणि औषधोपचार पशुसंवर्धन विभागामार्फत केले जाते. त्यामुळे या पक्ष्यांपासून निर्माण होणारे चिकन आणि अंडी ही सुरक्षित व पौष्टिक असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे.
अफवांचा फटका
सोशल मीडियात चुकीचे संदेश जनमानसात पसरल्यामुळे नागरिकांनी सरसकट चिकन आणि अंडी खाणे बंद केले आहे. वास्तविक कोरोनाच्याही सुरुवातीच्या काळात अशाच अफवांमुळे चिकन आणि अंडी खाणे बंद करण्यात आले होते. मात्र, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी चिकन व अंडी महत्त्वाची ठरतात. बर्ड फ्लू विषाणू ७० डिग्री सेंटीग्रेड तापमानात केवळ ३ सेकंदात नष्ट होतात. त्यामुळे शिजवलेले चिकन, उकडलेली अंडी खाण्यास निर्धोक आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे, असेही असोसिएशनने सांगितले आहे.