नवी दिल्ली – कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना, थकवा, शरीरदुखी, खोकला, घसा दुखणं तसंच श्वास घ्यायला त्रास होण्यासारखी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी काय आणि कशी काळजी घ्यावी याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
रुग्णांनी बरे झाल्यानंतरही मास्क घालणं, हात धुण्यासह शारिरिक स्वच्छता राखणं तसंच परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचं पालन करावं. दररोज पुरेसं गरम पाणी प्यावं, रोगप्रतिकारक आयुष औषधं घ्यावित, प्रकृतीच्या स्थितीनुसारच दैनंदिन कामं करावित, तसंच नोकरी व्यवसायासाशी संबंधित कामं टप्प्याटप्प्यानं सुरु करावित असं या सूचनांमधे म्हटलं आहे.
रुग्णांनी ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतले, त्यांच्या सल्ल्यानुसार दररोज योगासनं, प्राणायम आणि ध्यानधारणा विशेषतः श्वसनाशीसंबंधित व्यायाम करावेत, सकाळ संध्याकाळ चालण्याचा व्यायाम करावा, संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा, तसंच धूम्रपान आणि मद्यपान टाळावं असंही या सूचनांमधे म्हटलं आहे.