नवी दिल्ली – देशभरातील बनावट जीएसटी बिलांच्या माध्यमातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात असल्याची बाब स्पष्ट होत आहे. यासंदर्भात जीएसटी विभागाने देशभरात जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या अडीच महिन्यात ८ चार्टर्ड अकाऊंटंट्स (सीए)सह तब्बल २५८ जणांना अटक केली आहे. यातूनच या गैरव्यवहाराची व्याप्ती स्पष्ट होत आहे.
जीएसटीच्या दक्षता विभागाच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सीएला शनिवारी जयपूरमध्ये त्याच्या चार व्यावसायिक साथीदारांसह अटक करण्यात आली. काही जण २५ बनावट कंपन्यांमार्फत बोगस चालनामधून इनपुट टॅक्स क्रेडिट वापरत असत. जीएसटी विभागाने ८०० कोटींची वसुली केली आणि २५०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध परकीय विनिमय व तस्करी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटीने चालविलेल्या अभियानामध्ये आतापर्यंत आठ हजार बनावट जीएसटीएन कंपन्यांविरूद्ध २५०० गुन्हे दाखल झाले आहेत.
या बनावट कागदपत्र वापरणाऱ्यांवर कारवाई करत प्राधिकरणाने ८२० कोटी रुपये वसूल केले आहेत. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला सीएच्या अटकेची माहिती कळविण्यात आली असून त्यांनाही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. अटक केलेल्या आठ सीएपैकी दोन जण मुंबईतील आहेत.