देवळा : जिल्ह्यात नोंदणी झालेल्या ४० हजार दस्तांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १२ जणांच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
देवळा तालुक्यात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्ताऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार केल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यातून उपनिबंधकांसह संपूर्ण महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणाच्या खोलात शिरुन तपास करण्यासह जिल्ह्यात अन्य काही ठिकाणीदेखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी मुद्रांक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्याची तीव्र दखल घेत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात संबंधित मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित केला. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी चौकशीचे आदेश दिले असून, त्यांनी १२ जणांचे पथक स्थापन केले आहे. गेल्या काही काळात तब्बल ४० हजार दस्त झाले असून, या सर्वांचीच तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार आतापर्यंत २४१ दस्त तपासण्यात आले आहेत. त्याचा अद्याप अहवाल आला नसून,
जिल्ह्यातील इतर दुय्यम निबंधक कार्यालयांतही बनावट दस्ताद्वारे फसवणुकीचे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे ४० हजार दस्त रँडमली तपासत असून, त्यात कुठे शंका वाटल्यास त्याची सखोल तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.