नाशिक – बनावट मुखत्यारपत्र तयार करून खोटे खरेदीखत आणि बनावट चेक देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सात व्यक्तींसह अज्ञातांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाजी पुंजाजी आहिरे (रा. महालपाटरे, ता. देवळा, नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता जिभाऊ गांगुर्डे, मयूर जिभाऊ गांगुर्डे, सुशांत जिभाऊ गांगुर्डे (रा. आकाशवाणी रोड, नाशिक), सतीश सखाराम चौधरी, (रा. रविवार पेठ), वसंत मानाजी तालखे (रा. दिंडारीरोड), त्र्यंबक छोटू पवार (रा. शरण पुररोड), प्रणाली रवींद्र सुर्वे (रा. नाशिक) व इतर अज्ञात अशी संशयितांची नावे आहेत. सर्व संशयितांनी संगनमत करून फिर्यादी दादाजी आहिरे यांना लिहीता वाचता येत नसल्याचा गैरफायदा घेतला. व यांचे मालकीचे म्हसरुळ शिवारातील सर्व्हे नं. १६३/३अ हे क्षेत्र खोटे मुखत्यारपत्र तयार करून, खोटे सातबारा उतारे लावून बनावट खरेदीखत केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक साजिद मन्सुरी तपास करत आहेत.
————-
पाईपलाईन रोडला घरफोडीत दागिने लंपास
नाशिक – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश अज्ञात चोरट्याने २ लाख १५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी संकेत नंदन दाणी (रा. पाईपलाइन रोड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शनिवार (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कडी तोडून दाणी यांच्या घरात प्रवेश केला. ५० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, १ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या व ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक राठोड तपास करत आहेत.
———–
तिघांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
नाशिक – पैसे घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी राहूल उर्फ गांग्या पोपट शिंदे (रा. संत कबीरनगर) याने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशोक साळवे, गुप्पु साळवे, संतोष साळवे (सर्व रा. संत कबीरनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
राहूल हा शनिवारी (दि. २६) रात्री आठ वाजेच्या सुमारास पैसे घेण्यासाठी अशोक साळवे यांच्याकडे गेला होता. यावेळी गुप्पु साळवे व संतोष साळवे याने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादी राहूल याने मारहाण का करता अशी विचारणा केली असता अशोक साळवे याने लाकडे दांडक्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी ए. एस. पठाण तपास करत आहेत.