नवी दिल्ली ः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याच्या बाहेर स्फोटके ठेवल्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आरोपी आणि निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे काही दिवसांपूर्वी थांबलेल्या पंचतारांकित हॉटेलची एनआयएने सोमवारी (२२ मार्च) झडती घेतली.
एनआयएचे अधिकारी म्हणाले, की एनआयएच्या पथकाने मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या हॉटेल ट्रायडेंटच्या एका खोलीची झडती घेतली. तिथे सचिन वाझे १६ फेब्रुवारीपासून २० फेब्रुवारीपर्यंत थांबले होते. वाझे यांनी कथितरित्या एका बनावट आधारकार्डच्या आधारावर हॉटेलची खोली बुक केली होती. त्यात खोट्या नावासह त्यांचा फोटो होता.
हॉटेलमध्ये राहून मुंबई गुन्हे शाखेत काम करायचे वाझे
एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की हॉटेलमधून कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसच्या अधिका-यांनी सांगितले, की वाझे बनावट ओळखपत्राद्वारे हॉटेलमध्ये थांबण्याची तारीख आणि परवाना शर्तींचे उल्लंघन करणा-या मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करण्याची तारीख एकसारखी दर्शवत आहे. वाझे यांनी त्या तारखांदरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तचर विभागातही काम केले आहे. एनआयएच्या पथकाने हॉटेलच्या खोलीतून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यात काय आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही.
हिरेन यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला
एनआयएचे पथक मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा जबाब घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले हिरेन यांचे भाऊ विनोद म्हणाले, एनआयएने घरी येऊन आम्हाला तपासाची स्थिती सांगितली. ते एटीएसकडून माहिती घेणार असल्याचेही सांगितलं. माझ्या भावाच्या हत्येसंदर्भात अधिकृतरित्या गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. त्यांनी आम्हाला सांगितले, की ते प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी दोन दिवसात पुन्हा भेटायला येणार आहेत. ते थोड्यावेळ येऊन परत गेले.
हिरेन यांच्या हत्येप्ररकरणी दोघांना अटक
एटीएसने रविवारी हिरेन यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. माजी हवालदार विनायक शिंदे आणि सट्टेबाज नरेश गोर अशी संशयितांची नावे आहेत. एका एनकाउंटरमध्ये दोषी शिंदेला याला कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. महाराष्ट्र एटीएचे अधिकारी शिवदीप लांडे यांनी ही माहिती दिली. मुंबई पोलिसांतील अधिकारी सचिन वाझे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. सट्टेबाजाने वाझे यांना पाच सीमकार्ड पुरवले होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयापुढे उभे करण्यात आले. त्यांना ३० मार्चपर्यंत एटीएसच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.