मुंबई – गेल्या काही वर्षांपासून बडोदा, देना आणि विजया बँकेच्या समायोजनाबद्दल ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काहींना भिती तर काहींच्या मनात कुतुहलही आहे. बँक आफ बडोदाने विजया आणि देना बँकेच्या ३ हजार ८९८ शाखांचे समायोजन यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. ही बाब ग्राहकांना दिलासा देणारी आहे.
डेबीट कार्डस
बँकेने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा यांनी म्हटले आहे की कोविडच्या वातावरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करून समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी बँक आफ बडोदाच्या सुविधा व डिजीटल सोयींचा लाभ घेण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. ज्या ग्राहकांची खाती मायग्रेट करण्यात आली आहे ते डिजीटल माध्यम, कॉल सेंटर किंवा कुठल्याही शाखेतून आपल्या खात्याची माहिती घेऊ शकतात. याशिवाय ग्राहकांकडे असलेले डेबीट कार्ड्स आत्ताच परत करायची गरज असणार नाही. जोपर्यंत कार्डची एक्स्पायरी आहे तोपर्यंत ते वापरता येणार आहे. मुख्य म्हणजे सर्वच ग्राहकांना बँक आफ बडोदाचे बडोदा कनेक्ट आणि एम-कनेक्ट ही माध्यमे वापरता येणार आहेत.
क्रेडीट कार्ड
बँकेने डिसेंबर २०२० मध्ये १ हजार ७७० देना बँक शाखांचे समायोजन पूर्ण केले आहे. ५ कोटींपेक्षा अधिक ग्राहकांचे खाते मायग्रेट करण्यात आले होते. शाखांशिवाय सर्व एटीएम, पीओएस मशीन आणि क्रेडीट कार्डही ट्रान्सफर झालेले आहेत. भारतातील एकूण ८ हजार २४८ शाखा आणि १० हजार ३१८ एटीएममध्ये या ग्राहकांना सेवा मिळणार आहे.