नवी दिल्ली : दिवाळीसारख्या सण – उत्सवाच्या हंगामात कांदे आणि बटाट्यांच्या वाढत्या किंमतींनी गृहीणींचे किचन बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशभरातील बटाट्यांची सरासरी किरकोळ किंमत 39.30 रुपयांवर गेली. दिल्लीमध्ये ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीत बटाट्याची सरासरी किरकोळ किंमत 40.11 रुपये होती, सुमारे 10 वर्षांनंतर म्हणजे जानेवारी 2010 नंतरची ही सर्वोच्च किंमत आहे.
वार्षिक तुलनेत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बटाटाची सरासरी किरकोळ किंमत 20.57 रुपये होती. याचा अर्थ या वेळी ती दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्लीत बटाटाची किरकोळ किंमत 25 रुपये होती ,आणि यावेळी ते 60 टक्के जास्त आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात बटाट्याची किरकोळ किंमत देशात कायम आहे, परंतु या महिन्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात बटाटा महागला जाऊ लागला, जेव्हा त्याची सरासरी मासिक किरकोळ किंमत 23 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचली.
एप्रिल आणि मेमध्ये बटाट्याच्या किंमतींमध्ये वाढ होतच राहिली. यामागील एक कारण म्हणजे मागील वर्षांच्या तुलनेत या वेळी रब्बी हंगामात बटाट्याचा साठा कमी होता. काही अंदाजानुसार, देशभरात केवळ 36 कोटी पोत्या (प्रत्येक पोत्यात 50 किलो) बटाटे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले होते. 2019 मध्ये ही संख्या 48 कोटी, 2018 मध्ये 46 कोटी आणि 2017 मध्ये 57 कोटी होती. टाळेबंदीनंतर बटाट्याचे दर वाढू शकतात, असा इशारा मंत्रालयाने यापूर्वीच जारी केला होता. परंतु किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही विशेष उपाययोजना केली गेली नाही. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत नेपाळ, ओमान, सौदी अरेबिया आणि मलेशिया येथे भारताने 1.23 लाख मेट्रिक टन बटाटे निर्यात केले.