दिंडोरी – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अर्थव्यवस्था विस्कळित झाली असल्याने नागरिकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडली आहे. अशा वाईट परिस्थितीत फायनान्स कंपनीकडून सक्तीने हप्ते वसुली केली जात आहे. त्यासाठी वसुली एजन्सी नेमली जात असून सदर वसुली करणारे अरेरावी दमबाजी करत वसुली करत असल्याचा आरोप केला जात आहे. या व्यक्तींकडून पैशांचा तगादा लावला जातो. पैसे न दिल्यास अर्वाच्या भाषेत शिवीगाळ, मारहाण केली जाते. दिंडोरी तालुक्यात देखील बजास फायनान्स कंपनीकडून सक्तीने वसूल करण्यात येत आहे. बजाज फायनान्स कंपनीच्या दिंडोरी वसुली एजन्सी कडून सचिन राजू पवार या नागरिकास फायनान्स हप्ता दिला नाही, म्हणुन शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात भादवि कलम 323,506,508 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड व कर्मचारी करत आहे.