नाशिक – पाकिस्तानला युद्धात धूळ चारणारा आणि भारतीय लष्कराच्या ताफ्यातील टी ५५ हा रणगाडा काही महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये दाखल झाला आहे. लेखानगर येथील वाहतूक बेटाच्या ठिकाणी तो ठेवला जाणार आहे. या वाहतूक बेटाच्या सुशोभिकरणाचे भूमीपूजन संक्रांतीच्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या हस्ते होणार आहे. तशी माहिती नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी दिली आहे.
नाशिक मधील नागरिकांना भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाची, शौर्याची महती कळावी आणि तरुणांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी नाशिक मध्ये सैन्यदलाची वॉर ट्रॉफी असावी अशी संकल्पना नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी मांडली. तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने लष्कराने टी ५५ हा रशियन बनावटीचा रणगाडा नाशिक महापालिकेला देण्यास मंजुरी दिली.
गेल्या दीड वर्षांपासून हा रणगाडा नाशिक मध्ये आणण्यासाठी तिदमे प्रयत्नशील होते. अलीकडेच त्यांनी महासभेतच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या. काही महिन्यांपूर्वी हा रणगाडा पुणे येथून आणण्यात आला. ३७ टन वजन असलेला हा रणगाडा नाशिक महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. जुने सिडकोतील लेखानगर येथे हा रणगाडा ठेवण्यात येणार आहे.
सध्या हा रणगाडा जुने सिडकोतील राजे छत्रपती व्यायामशाळेसमोरच्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आला आहे. टी ५५ या रणगाड्यांनी सन १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या ५८ रणगाडे नष्ट केले होते. सन १९६० ते १९८० या काळात सीमाहद्दीवर या रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्यादलात चांगलीच दहशत निर्माण केली होती. भारतीय सैन्यदलात या रणगाड्यांनी ४० वर्षे देशसेवा केली आहे आणि आता नाशिकच्या लौकिकात भर घालणार आहे.
मकर संक्रांतीच्या शुभमूहूर्तावर लेखानगर वाहतूक बेट सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपूजन सकाळी ११.३० वाजता होणार असल्याचे तिदमे यांनी सांगितले आहे.
बघा लेखानगर चौक बनणार असा (व्हिडिओ सौजन्य – नगरसेवक प्रवीण तिदमे)