नाशिक – मालेगाव तालुक्यातल्या दाभाडी गावात रंगीत पत्ताकोबी अर्थात फ्लॉवरचं उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. दाभाडी इथले शेतकरी महेंद्र निकम यांनी हे वाण विकत घेऊन जांभळ्या आणि पिवळ्या रंगातल्या कोबीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतात पाहणी करून महेंद्र निकम यांचं कौतुक केलं आहे. सिजेंटा इंडिया लिमिटेड कंपनीनं विकसित केलेल्या कोबीच्या वाणाचं परीक्षण हरियाणामधल्या कर्नाल इथं झालं होतं.
महेंद्र निकम यांंची दाभाडी इथं पाच एकर जमीन असून, त्यांनी हे वाण ४० हजार रुपयांनी विकत घेतलं. त्यांनी सांगितलं की, मी जांभळ्या रंगाची व्हेलेंटिनो आणि पिवळ्या रंगाची कॅरिटिना या कोबीची लागवड केली. या कोबीतील पोषक तत्व आणि त्यांच्या रंगांमुळे मेट्रो शहरांमध्ये अधिक मागणी आहे. महाराष्ट्रात अशा प्रकराच्या कोबीचं उत्पादन घेणारे महेंद्र निकम हे एकमेव शेतकरी आहेत.










