वर्धा – सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, त्यावेळी त्यांच्यावर चिखल आणि दगडांचा मारा झाला होता. त्यांनी झेललेल्या संकटापेक्षा तुम्ही केलेले कष्ट कमी असले तरी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचेच स्वप्न साकार करीत आहात. ग्रामीण भागातील महिलांनी निर्माण केलेली वेगळ्या प्रकारच्या उद्योगाची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे ,असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केले
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावात मागासवर्गीय महिलांनी तेजस्वी सोलर एनर्जी को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून या माध्यमातून सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारला आहे. आज याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उमेदच्या स्वाती वानखेडे, तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या संचालक संगीता वानखेडे, मनीष कावळे उपस्थित होते.
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे, शिक्षण घेऊन मोठे होण्याचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करीत असल्याबाबत त्यांनी तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या सर्व महिलांचे अभिनंदन केले. या प्रकल्पात तयार होणाऱ्या सोलर पॅनलच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. या फॅक्टरीमध्ये तयार होणारा माल हा गोडाउनमध्ये शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी महिलांना दिली.
यावेळी बोलताना खासदार यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा महिलांनी दुसऱ्यांना नोकरी देण्याचा पर्याय स्वीकारून उद्योग उभारला आहे. हा उद्योग स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग करण्याचा सल्ला यावेळी दिला.
मागासवर्गीय महिलांना या उद्योगामुळे गावातच रोजगार मिळाला ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असे मनोगत जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी यावेळी व्यक्त केले.
महिलांनी सुरू केलेला हा राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच आणि देशातील दुसरा प्रकल्प आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मात्र या उद्योगात मोठ्या आणि परदेशी कंपन्या असल्यामुळे आपल्यासमोर गुणवत्ता आणि किंमत या दोन बाबींवर स्पर्धेत टिकणे महत्वाचे आहे. त्यामुळे उद्योगातील उत्पादन गुणवत्तापूर्ण राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आपल्याला सहकार्य करण्यास मी या क्षेत्राचा आमदार म्हणून सदैव तयार असेल अशी ग्वाही आमदार रणजित कांबळे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओंबासे यांनी प्रास्ताविकात महिलांच्या उद्योगाची माहिती दिली. तर कंपनीच्या संचालिका संगीता वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करताना 3 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा खडतर प्रवास आज आनंद आणि समाधान देणारा ठरत आहे. आमच्यासारख्या 10 वी 12 वी शिकलेल्या महिलांनी घेतलेली ही गरुड झेप प्रशासनाच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी पालकमंत्री केदार व उपस्थित मान्यवरांनी कंपनीची पाहणी करून महिलांच्या प्राविण्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार सत्यजित बडे यांनी व्यक्त केले.