पुणे – शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. पुणे शहरात तर बेड नसल्याने चक्क वेटिंग रूममध्ये रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात येत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
पुण्यातील पिंपरी भागात सध्या रूग्णालयात बेडचा अभाव आहे. येथे ही समस्या इतकी वाढली आहे की, रुग्णांना ऑक्सिजन लावून वेटिंग रूममध्ये बसण्यास भाग पाडले जात असून त्यांच्यावर येथेच उपचार केले जात आहेत. दरम्यान, आरोग्य प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच ऑक्सिजनसह बेडचे स्वतंत्र सेटअप केले जात आहे.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एकूण ४०० बेड आहेत, त्यापैकी ५५ आयसीयू आहेत. मंगळवारीच हॉस्पिटलमधील सर्व बेड भरल्या. पुण्यात व्हेंटिलेटर रुग्णांच्या संख्येच्या दृष्टीने अपुरे सिद्ध होत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात रूग्णांची संख्या निरंतर वाढत असल्याचे रुग्णालयाचे सहाय्यक प्रा. डॉ. कौस्तुभ कहणे यांनी सांगितले. तसेच रूग्णांना श्वास घेण्यात त्रास होत असल्यास बेडची व्यवस्था होईपर्यंत त्यांना ऑक्सिजनच्या आधारावर ठेवले जाते.
नवीन रुग्ण येताच त्याच्या आजाराच्या तीव्रतेच्या आधारावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता असेल आणि बेड नसेल तर रुग्णाला अडचण येऊ नये म्हणून त्याला तातडीने ऑक्सिजनचा आधार दिला जात आहे.
कोरोनाच्या नवीन लाटेमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने पुणे जिल्हा जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्हा प्रशासनाने २ एप्रिलपासून जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू केला. तसेच शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, हॉटेल, बार आणि सिनेमा हॉल सात दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मिडियात सध्या एक फोटो व्हायरल झाला असून त्यात हॉस्पिटलच्या वेटिंग रुममध्ये चक्क कोरोना बाधिताला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. या विदारक दृश्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.