मुंबई – चीनमधील अनेक प्रांतांमध्ये मुस्लिमांसाठी असलेले प्रशिक्षण केंद्र आता अत्याचाराचे अड्डे म्हणून उघडकीस येत आहेत. या शिबिरांमध्ये होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक कहाण्या पुढे आल्या आहेत. मात्र चीन प्रत्येकवेळी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतो.
प्रशिक्षण केंद्रात बंदिस्त असलेल्या लोकांना शिकविण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेने अत्याचाराचा खुलासा केलेला आहे. तिने सांगितले की इथे उयगर मुस्लीमांना साखळदंडांनी बांधून ठेवले जाते. याशिवाय महिलांवर सामूहिक बलात्कार केलाजातो. यापूर्वीही अश्या अनेक घटना पुढे आल्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी चीनला मानवाधिकारांचे उल्लंघन करणारा देश म्हणून संबोधणे सुरू केले आहे.
चीन सरकारच्या शिनजियांग स्थित दोन प्रशिक्षण केंद्रांमध्ये एक शिक्षिका क्विलबिनर सिदिक हिला तैनात करण्यात आले होते. तिने या केंद्रात जवळपास तीन महिने घालवले. चीनी सैन्याला एका उयगर महिलेला स्ट्रेचरवर बाहेर घेऊन जाताना आपण बघितल्याचे या शिक्षिकेने सांगितले.
स्ट्रेचरवरील या महिलेचा चेहरा पूर्णपणे थकलेला होता. तिच्या चेहऱ्यावर तेज नव्हते. ती श्वाससुद्धा घेऊ शकत नव्हती. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की तिचा मृत्यू झालेला आहे. पण त्याने मृत्यूचे कारण सांगितले नव्हते, असेही ही शिक्षिका म्हणाली. २०१७ मध्ये आपल्याला दोन प्रशिक्षण केंद्रांमध्ये बळजबरीने तैनात करण्यात आले होते, असेही तिने सांगितले.
चहूबाजूंनी सुरक्षा
या शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षण केंद्रांच्या चहूबाजूंना सुरक्षादल तैनात असतात. अर्थात तिच्याकडे या आरोपांना सिद्ध करण्यासाठी कुठलाही पुरावा नाही. मात्र ज्या महिलांनी शिबिरात सामूहिक बलात्कार व लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे, त्यांच्याशी मिळताजुळते शिक्षिकेचे आरोप आहेत. चीनवर यासंदर्भात बरेचदा आरोप झाले आहेत की या देशात मुस्लीमांचा नरसंहार सुरू आहे. मुस्लीम महिलांवर गर्भपातासाठी बळजबरी केली जात आहे.
अत्याचाराच्या पद्धतींवर होते चर्चा
या शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणात केंद्रात तैनात पोलीस आपापल्या अत्याचाराच्या पद्धतींवर चर्चा करतात. आपण महिलेचे लैंगिक शोषण कसे केले, हे ते एकमेकांना सांगत असतात. या केंद्रात आपण शिकविण्यासाठी पहिल्यांदा पोहोचलो तेव्हा जवळपास शंभर पुरुष–महिलांना साखळदंडांनी बांधून ठेवले होते. त्यांना शिकविण्यासाठी खडू हातात घेतला तर त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले, असेही तिने सांगितले.