जळगाव – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग अधिक जलद गतीनं होत असून तो अधिक घातक ठरत आहे. कोरोनावर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीनं चाचणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं दिसायची. त्यानुसार चाचणी करून रुग्णांवर उपचार केले जायचे. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये वेगळी लक्षणं दिसून येत आहेत. त्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा, जुलाब, चव जाणे, डोकेदुखी आदी प्रकारची लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला नव्या लक्षणांशी जुळवून उपचार करणं अवघड जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळत असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीचे २-३ दिवस चांगला असलेला रुग्ण अचानक गंभीर होऊन तो मृत्यूकडे जात असल्याची बाब समोर आली आहे. हीच गोष्ट घातक ठरत असून सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.
दुसऱ्या लाटेतील रुग्णांची लक्षणं पाहता अनेक जण त्याकडे टायफॉईड म्हणून पाहात आहेत. चार-पाच दिवसांत रुग्ण गंभीर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सध्या टायफॉईडची साथ सुरू नसून, अशी लक्षणं आढळल्यास तातडीनं कोरोनाची चाचणी करून घ्यावी. निदान होताच त्वरित उपचार करून घ्यावे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगानं फैलाव होत आहे. एकाच दिवसात १६०० च्या वर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.