अवांछित
कधीकधी लहानपणी आपल्याच बापाविषयीची एखाद्या मुलाच्या मनात तयार झालेली नकारात्मक भावना, तो मुलगा मोठा झाल्यावर देखील तशीच कायम रहाते, ती बदलत नाही किंवा ती बदलण्याचा प्रयत्न मुलगा किंवा बाप या दोघांकडूनही होतनाही. आयुष्याच्या वाटेवर पुढे जाता जाता एक अशी वेळ येते, जेव्हा काही प्रसंगामुळे ही दरी कमी होते. मुलगा उद्यडया डोळयांनी सत्य बघताे आणि मग त्याच्या मनात कायम घर करुन राहीलेली आपल्या बापाविषयीची नकारात्मकता एकदम सकारात्मक होवून जाते. तोपर्यन्त मात्र बराच वेळ झालेला असताे. याच एका संकल्पनेचा धागा धरुन, मुलगा आणि बाप यांच्या नात्यावर आधारित असलेला ’अवांछित‘ हा मराठी चित्रपट नुकताच मार्च महिन्यात झीप्लेक्स वर प्रेक्षकांसाठी प्रसारित झालाय.
– जगदीश देवरे
समाजवेडा, ध्येय्यवेडा असा मधुसूदन उर्फ मधु दा (किशोर कदम) हा मुळचा मराठी माणूस. निरुपमा वध्दाश्रमाचे व्यवस्थापन सांभाळण्याची नोकरी मिळते आहे म्हणून तो आपल्या पत्नीला (मृणाल कुलकर्णी) घेवून आपल्या लहान मुलासह कोलकात्यात रहायला जातो. निरुपमातल्या एका – एका नौटंकीबाज म्हाता-यांची जबाबदारी सांभाळतांना सहाजिकच मधुसूदन रात्री अपरात्री आपल्या कामात व्यस्त होवून जातो.
एक दिवस आपली पत्नी तापाने प्रचंड फणफणलेली असतांना आणि आपला मुलगा ’तिला अशा अवस्थेत सोडून जावू नका‘ असे सांगत असतांना देखील केवळ निरुपमातून इमर्जन्सी आली म्हणून सर्वप्रथम निरुपमात जातो. तो परत येईपर्यन्त त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली असते. आपला बाप आपल्या आईची गंभीरतेने काळजी घेत नाही मात्र दुसरीकडे निरुपमाची प्रचंड काळजी घेतो, हे आपल्या बापाविषयीचे आणि निरुपमाविषयीचे तयार झालेले नकारात्मक चित्र त्याचा मुलगा तपन उर्फ तोपू (अभय महाजन) याच्या मनात कुठेतरी खोलवर घर करुन जाते.
बाप मुलाला शिकवतो मोठा करतो. पण हे नाते सुरु असते कोणत्याही संवादाशिवाय. पुढे हाच मुलगा फिलाॅसॉफीचा लेक्चरर होतो. परंतु यासर्व प्रक्रियेत मुलाच्या मनात बापाविषयी तयार झालेल्या त्या एकमेव भावनेतुन, बापाविषयीचा अवांछितपणा दूर जात नाही. पुढे मग तपनच्या आयुष्यात अपघाताने अशीमा मनाेहर (मृण्मयी गोडबोले) नावाची तरुणी येते.
अशीमा ही फॅशन स्टायलीस्ट, एकदम मॉडर्न तरुणी. तिच्या आधीच्या विवाहापासून तिचा घटस्फोट झालेला. जुन्या विचारांचा मधुसूदन तिचा सुन म्हणून स्वीकार करायला तयार होत नाही. पण…..! आता सगळेच कथानक तुम्हाला इथे सांगून टाकले तर तुम्हाला चित्रपट बघायला मजा येणार नाही. नाजुक नात्यांवरचे हे सकस कथानक पुढे प्रत्यक्ष बघुन अनुभवण्याइतके सुंदर आहे. ते प्रेक्षकाला सोडत नाही आणि एका वेगळया वळणावर येवून हा चित्रपट थांबतो. हे वळण बघतांना बाप जिंकतो की मुलगा, याचा विचार कदाचित हा चित्रपट बघणारे प्रेक्षक करणार नाहीत. केवळ नात्यांची शिलाई बांधतांना काय काळजी घेतली पाहिजे याचा सारासार विचार मात्र नक्की करतील इतका हा चित्रपट मजबुत आणि दमदार आहे.
किशोर कदम हा मुळात कसदार कवी माणूस असल्याने सहाजिकच तो उत्तम अभिनेता साकारु शकतो हे या चित्रपटातून पुन्हा एकदा समोर आले आहे. वुध्दाश्रमात आलेल्या म्हाता-यांमध्ये रमणारा, त्यांना आंघोळ घालणारा, प्रसंगी त्यांचे केस विचंरुन देणारा आणि त्यांची मनस्थिती ओळखून त्याप्रमाणे त्यांच्याशी वागणारा अनुभवी मधुसूदन एकीकडे आणि आपल्यापासुन दुर जावू पहाणा-या मुलाशी जवळीक करण्याच्या प्रयत्नात यश येत नाही म्हणून एकांतात वेदना सहन करणारा एक बाप दुसरीकडे. किशोर कदम यांनी या दोन्ही व्यक्तीरेखा अतिशय उत्तमरितीने साकारल्या आहेत.
डॉ.माेहन आगाशे (नितीन दास उर्फ दासबाबू) यांची भुमिका देखील अफलातून. वुध्दाश्रमातला एक म्हातारा पंरतु, मधुसूदनचा खास मित्र, मार्गदर्शक झालेला दासबाबू निरुपमाला ७५ वर्ष पुर्ण झाली म्हणून एकदम टिपीकल बॉलीवुड डान्स करतो आणि प्रसंगी मधूसदन बरोबर चहा घेतांना मिश्कीलपणे ‘चिअर्स’ देखील करतो हे पात्र डॉ.मोहन आगाशे यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्याने छान रंगविले आहे.
मृणाल कुलकर्णींच्या वाटयाला फारशी मोठी भुमिका आलेली नसली तरी जी काही भुमिका आली आहे त्याला नेहमीप्रमाणे न्याय देण्याचे काम तिने केले आहे. साधेसरळ, काटकोनात चालणारे पंरतु, बापाच्या वागण्याविषयी मनात कायम खेद घेवून बसलेले तपन हे पात्र अभय महाजनने छान साकारले आहे आणि त्याच्यासोबत असलेली अवखळ, आधुनिक विचारसरणीची अशिमा मृण्मयी गोडबोलेने देखील उत्तमपणे उभी केली आहे.
याखेरीज, जेष्ठ अभिनेते सुहास जोशी, योगेश सोमण आणि राजेंद्र शिंदे यांसारख्या दिग्गज मराठी कलाकारांबरोबरच बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकुरता, राणा बासू ठाकुर यांसारख्या बंगाली कलाकांराचा अभिनय देखील आपल्याचा या चित्रपटात बघायला मिळतो. या
चित्रपटला अनुपम रॉय यांनी संगीत दिले असून ओंकार कुलकर्णी यांनी लिहिलेली गाणी देखील छान आहेत. शुभो नाग यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
पटकथा ताकदीची असली तरी त्या तुलनेत जे दमदार संवाद असायला हवेत तितके ते काही ठिकाणी नाहीत याची खंत चित्रपटात बघतांना जाणवते. सिनेमा मराठी आहे परंतु, कथानकाची मुळची सगळी देहबाेली ही बंगालच्या वातावरणातली असल्याने चित्रकरण आणि संगीतात तसा बंगाली मिठाईसारखा दुहेरी स्वाद मराठी प्रेक्षकांना चाखायला मिळतो.
काही दिवसांनी राष्टीय स्तरावर मोठया आणि मानाच्या समजल्या जाणा-या विविध अॅवार्ड नामाकंन यादीत या चित्रपटाचे नाव दिसले तर निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही इतका हा चित्रपट अप्रतिम बनलाय. झीप्लेक्स या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर उपलब्ध असलेला हा एक हटके असा चित्रपट नक्की बघावा असा चित्रपट आहे.