नेदरलँड – जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. अशात अचानक नेदरलँडमधून एक अजब गजब घटना पुढे आली आहे. येथील दक्षिण भागात राहणारे लोक कायम न्युमोनियाने ग्रस्त आहेत. संपूर्ण नेदरलँडमध्ये बकऱ्यांचे फार्म असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना हा त्रास होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता बकऱ्यांच्या माध्यमातून नव्या महामारीला सामोरे जाण्याची वेळ तर जगावर येणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या बारा वर्षांमध्ये नेदरलँडच्या दक्षिण भागातील डेअरी फार्ममधील बकऱ्यांच्या गर्भपाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. त्यानंतर पशु चिकित्सकांना सँपल्स पाठविण्यात आले. ९ ते १० नमुन्यांमध्ये काहीही आढळले नाही. त्यानंतर २००८ मध्ये नेदरलँडमध्ये श्वसन संक्रमण तापाचे प्रमाण वाढत असल्याचे निष्पन्न झाले. या आजाराने बकऱ्या, मेंढ्या आदी जनावरांना आपल्या घेऱ्यात घेतले आहे.
नेदरलँडच्या सरकारने ५० हजार बकऱ्या मारण्याचे आदेशच देऊन टाकले आहेत. कारण आता सर्वसामान्य लोकही या आजाराने ग्रस्त आहेत. अनेकांना ह्रदयविकाराचा धक्काही बसला आहे. तर आतापर्यंत या आजाराने ९५ लोकांचा जीवही घेतला आहे. बकरी फार्मच्या जवळ राहणाऱ्यांना याचा अधिक धोका संभवतो. जेवढ्यांना हा आजार झाला आहे किंवा जीव गेला आहे त्यातील २० ते ५५ टक्के लोक न्युमोनियाने त्रस्त आहेत. हे सारे बकरी फार्मच्या एक ते दिड किलोमीटर परिसरात राहणारे आहेत.