मालेगाव – राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशाअंतर्गत मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच, सर्व शाळा आणि कॉलेज हे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही मालेगाव येथील गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने आज पूर्ण क्षमतेने शाळा सुरू ठेवली. ही बाब महापालिका आणि पोलिस यांच्या निदर्शनास आली. त्याची तत्काळ दखल घेत शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना शाळा व्यवस्थापनाने अशाप्रकारे बेजबाबदारपणा दाखविल्याने तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात प्रथमच शाळेविरुद्ध अशा प्रकारची आज कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.