वाशिम – संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामरावबापू महाराज यांचे निधन झाले आहे. अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धेविरोधात त्यांनी प्रबोधनाची मोठी चळवळ उभारली. व्यसनमुक्तीसाठी लढा दिला. सामाजिक सुधारणा व मानवतेच्या कल्याणाला वाहून घेतलेलं, संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढं घेऊन जाणारं, ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, मानवतावादी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे.
वाशिम जिल्ह्यातील श्रीपोहरादेवी संस्थानचे ते प्रमुख होते. त्यांनी संपूर्ण जीवनभर बंजारा बांधवांच्या आणि मानवतेच्या उन्नतीसाठी कार्य केले. सामाजिक व सुधारणावादी कार्याचा आदर्श निर्माण केला. बंजारा समाजाला व्ही.जे.एन.टी. प्रवर्ग मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. समाजातील अनिष्ट परंपरा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बालविवाह होऊ नयेत यासाठी त्यांनी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती केली. व्यसन मुक्तीसाठी त्यांनी मोठे कार्य केले. संत रामराव महाराज यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटकमधील गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते.
देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते. श्री पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा, तसेच राज्यातील तांड्यांचा विकास व्हावा, यासाठी ते आग्रही होते.