कोलकाता (पश्चिम बंगाल) – हुगळी येथे भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांच्या अंगावर विषारी रंग फेकण्यात आला. लॉकेट या हुगळी येथील चुंचुरा विधानसभा क्षेत्रात रविंद्रनगर कालीतला मैदानात वसंत उत्सवात दाखल झाल्या होत्या. त्या चुंचुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत.
तृणमुल काँग्रेसचे सरपंच विद्युत विश्वास यांनी हा प्रकार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. विश्वास यांनी मात्र या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी ३० जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले.
निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ७९.७९ टक्के मतदान झाले. निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये १० हजार २८८ ईव्हीएम आणि तेवढ्या व्हीव्हीपॅट मशीनचा वापर झाला. पहिल्या टप्प्यात एकूण १९१ उमेदवार रिंगणात होते. यात २१ महिलांचा समावेश होता. मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवारी रात्रीच हिंसा सुरू झाली. पूर्व मेदिनीपूरच्या पटाशपूरमध्ये रात्री सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या पोलिसांवर आणि जवानांवरही बॉम्ब फेकण्यात आले. यात दोन जवान जखमीही झाले.
पहिल्या टप्प्यातील मतदानात बुथवर गोंधळ, मतदारांना धमकावणे, ईव्हीएममध्ये छेडछाड अश्या विविध प्रकरणांमध्ये ६२७ तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. यात विविध गुन्ह्यांमध्ये १० लोकांना अटकही झाली. संपूर्ण दिवस भाजप आणि तृणमूलमध्ये आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. त्याचवेळी शनिवारी सकाळी एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्यामुळे वाद आणखीच पेटला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचा खून केल्याचा आरोप भाजपने केला आहे.