मुंबई – पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत जे एेकावे ते नवलच. अद्याप या निवडणुकीचा जेमतेम पहिला टप्पा पार पडला आहे. केवळ ३० मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले आहे. पण आतापर्यंत हिंसेच्या आणि अवैध आर्थिक व्यवहाराच्या घटनांनी विक्रमच मोडीत काढला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान आतापर्यंत राज्यात जवळपास अडिचशे कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पंजाबचे अतिरिक्त मुख्य निवडणुक अधिकारी संजय बसू यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत २४९.९कोटी रुपयांची रोख आणि सामान जप्त करण्यात आले आहे. यात ३७.७२ कोटी रुपये रोख, ९.५ कोटी रुपयांची दारू आणि ११४.४४ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसक घटना देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. बिहार किंवा उत्तर प्रदेशची निवडणूक वाटावी अशा घटना पुढे येत आहेत. नेत्यांवर जीवघेणा हल्ला होणे, कार्यकर्त्यांचा मृतदेह सापडणे या घटनांनी राजकारण चांगलेच तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. त्यात ७९.९ टक्के मतदान झाले. ३० जागांसाठी हे मतदान होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १ एप्रिलला होणार आहे. एकूण २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होत आहे. २९ एप्रिलला अखेरच्या टप्प्यातील निवडणूक होईल आणि २ मे रोजी मतमोजणी होईल.