नवी दिल्ली :- पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला आहे. या दोन्ही राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या (२७ मार्च) होणार आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावून प्रचार केला. भाजपाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती, खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, अभिनेता मनोज तिवारी यांना पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी आणले होते.
दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तिचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूलसाठी सभा व रोड शो आयोजित केले होते. कॉंग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी , माकपचे प्रदेश सचिव सूर्यकांत मिश्रा यांनीही आपआपल्या पक्षांचा प्रचार केला. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील जंगलमहालच्या पाच जिल्ह्यांतील तीस विधानसभा जागांवर मतदान होणार आहे.
बंगालमधील पहिल्या टप्प्यातील ३० पैकी सात मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. बंगालमध्ये या टप्प्यात निवडणूक लढविणार्या १९१ पैकी ९१उमेदवार करोडपती आहेत. कमीत कमी मालमत्ता असलेले दोन उमेदवार असून त्यांची एकूण मालमत्ता ५०० रुपये आहेत.
२७ मार्च रोजी आसाममधील ४७ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होत असून २६९ उमेदवार रिंगणात आहेत. आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील दिग्गज उमेदवार माजुली येथील मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, जोरहाटचे विधानसभा अध्यक्ष हितेंद्र नाथ गोस्वामी, आसाम गण परिषदेचे मंत्री बोकाखाटचे अतुल बोरा आणि कालिबोरचे केशव महंत हे आहेत.
अन्य महत्वाच्या उमेदवारांमध्ये गोहपूर येथील आसाम प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपुन बोरा आणि नाझिराचे कॉंग्रेसचे विधानसभेचे नेते देवव्रत सैकिया यांचा समावेश आहे. आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात २७ मार्च रोजी, दुसर्या टप्प्यात २ एप्रिल रोजी व तिसर्या टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.