कोलकाता ः पश्चिम बंगालमध्ये टप्प्याटप्प्याने विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना राजकीय विश्लेषक तेथील परिस्थितीचा अंदाज बांधत आहेत. शनिवारी चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेसचे निवडणुकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. या ऑडिओत प्रशांत किशोर मोजक्या पत्रकारांशी संवाद साधत असून, त्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत आहेत. तसेच भाजप बंगालमध्ये मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवित आहेत.
भाजपचे आयटी सेलचे प्रमुख आणि बंगाल निवडणुकीचे सह प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विटरवर हा ऑडिओ प्रसिद्ध केला आहे. टीएमसीच्या अंतर्गत सर्वेक्षणात भाजपचा विजय होईल ही गोष्ट प्रशांत किशोर क्लब हाउस अॅपवरील एका चर्चेत स्वीकारत असल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे. बंगालमध्ये टीएमसीविरोधात अँटी इन्कंबंसी असल्याचेही प्रशांत किशोर यांनी स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा ऑडिओ खोटा असून, भाजपचा कट असल्याचा पलटवार टीएमसीने केला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून हा अपप्रचार सुरू असल्याचे तृणमूलचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन म्हणाले.
बंगालमध्ये मोदी लोकप्रिय
अमित मालयवीय म्हणाले, बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहेत, असे प्रशांत किशोर स्वीकारत आहेत. संपूर्ण देशभरात ते लोकप्रिय आहेत. बंगालमध्ये हिंदू मतांचे ध्रुवीकरण हे एक सत्य आहे. त्यांच्याविरोधात लोकांचा रोष आहे.
५५ टक्के हिंदू मते भाजपला
सार्वजनिक झालेल्या या ४.१८ मिनिटांच्या ऑडिओच्या पहिल्या भागात बंगालमध्ये ध्रुवीकरण, मोदी, हिंदीभाषा आणि एससी या मुद्दयांवर प्रशांत किशोर बोलत आहेत. मोदी येथे लोकप्रिय आहेत. १ कोटींहून अधिक हिंदी भाषिक मतदार आहेत. अनुसूचित जातीचे २७ टक्के मतदार आहेत. त्यामध्ये मतुआ समाजाचा समावेश आहे. हा समाज भाजपसोबत आहे. मतुआ समाजाचे सगळे मत भाजपाला मिळत आहेत. ५० ते ५५ टक्के हिंदू मते भाजपला मिळतील. डावे पक्ष, काँग्रेस आणि टीएमसी गेल्या वीस वर्षात मुस्लिमांचे लांगूलचालन केल्याने याविरोधात लोकांचा रोष असल्याचे प्रशांत किशोर या ऑडिओमध्ये म्हणत आहेत. हा ऑडिओ सार्वजनिक झाल्याबाबत किशोर अनभिज्ञ होते, असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे.
भाजपने पूर्ण ऑडिओ जारी करावा
भाजपच्या दाव्यावर प्रशांत किशोर म्हणाले, मला आनंद आहे की ते गंभीरतेने घेत आहेत. परंतु भाजपने ऑडिओचे काही भाग सार्वजनिक केले आहेत. ऑडिओचे संपूर्ण भाग जारी करावे म्हणजे सत्य सर्वांसमोर येईल. मी काहीच चुकीचे बोललो नाही. त्यामध्ये भाजप १०० जागांवरही विजय मिळवू शकत नाही, हे सुद्धा बोललो आहे.