कोलकाता : दक्षिण भारताप्रमाणे बंगालचे चित्रपट तारे तारकाही राजकारणात नशीब आजमावत आहेत. बंगालमध्ये दोन दशकांपूर्वी काही प्रमाणात हा ट्रेंड सुरू झाला होता, परंतु विधानसभा निवडणूकीपूर्वी चित्रपट कलाकारांमध्ये राजकीय पक्षात येण्याची आता जणू स्पर्धा सुरू आहे. गेल्या एका महिन्यात तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपामध्ये डझनभरहून अधिक चित्रपट कलाकार सहभागी झाले आहेत.
एक काळ असा होता की, चित्रपट जगातील लोक राजकारणात येण्यात तयार नव्हते. मात्र दक्षिण भारतातील चित्रपट कलाकारांनी चित्रपटाच येण्याचा पायंडा पाडला. एम.जी. रामचंद्रन आणि जे. के. जयललिता यांनी तामिळनाडूच्या राजकारणात आपली छाप पाडली. आता चिरंजीवी, कमल हसन, रजनीकांत ते पवन कल्याण अशी अनेक मंडळी राजकारणात येत आहेत. तसेच बंगालमध्ये तृणमूल पक्षात सामील झालेल्यांमध्ये बंगाली चित्रपट अभिनेते दीपंकर दे आणि कांचन मल्लिक, अभिनेत्री सियोनी घोष, सयंतिका बॅनर्जी आणि जून मालिया आणि चित्रपट दिग्दर्शक राज चक्रवती यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, टॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते यश दासगुप्ता, हिरण चटर्जी आणि रुद्रनिल घोष, अभिनेत्री पायल सरकार, श्रबंती चटर्जी, पापिया अधिकारी आणि मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे. चित्रपटाच्या कलाकारांव्यतिरिक्त छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारही या दोन पक्षांमध्ये सहभागी झाले आहेत. परंतु यावेळी बंगाली चित्रपटसृष्टीतील कोणताही कलाकार कॉंग्रेस-एलएफ युतीमध्ये सामील झाला नाही.
पश्चिम बंगालमध्ये अभिनेते व सिंगूर चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ आमदार रवींद्र नाथ भट्टाचार्य हे देखील भाजपचे होते. अर्थात बंगाल चित्रपटातील तारे राजकारणात आणण्याचे श्रेय अर्थातच मुख्यमंत्री आणि तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जी यांना जाते. कारण त्यांनी तपस या कलाकाराला दोनदा विधानसभेत पाठविले. नंतर तपसनेही दोनदा कृष्णानगर येथून संसदही गाठली. बंगालमधील मतदारांचे चित्रपटातील कलाकारांचे आकर्षण पाहून ममता यांनी वीरभूममधून आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री शताब्दी राय यांना तिकीट दिले. शताब्दी यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या. या शिवाय अनेक कलाकार २०११ पासून तृणमूलच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकत आहेत.