बंगळुरू – आशियातील सर्वात मोठा एअरो इंडिया शो आजपासून येथे सुरू झाला आहे. या शोच्या माध्यमातून भारत जगालाही आपली शक्ती दाखवून देत आहे. यावेळी बी -१ लॅन्सर या अमेरिकन विमानाचाही यात समावेश आहे.
अमेरिकेच्या लढाऊ विमान विभागाचे डॉन हेफ्लिन म्हणाले की, यंदा अमेरिकेने एअरो इंडियामध्ये प्रथमच भाग घेतला असून यात महत्त्वाचे विमान बी -१ लँसर हवाई प्रदर्शनात सहभागी झाले आहे. या शोच्या उद्घाटनानंतर वायुसेना आणि एचएएल दरम्यान अतिरिक्त ८३ एलसीए तेजस मार्क -१ ए विमानांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दल प्रमुखही उपस्थित होते. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सीसीएस समितीने हा करार मंजूर केला होता.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत आपल्या संरक्षणासाठी इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही. पुढील ३६ महिन्यांत एचएएल हे वायुसेनेला प्रथम एलसीए-मार्क व्हॅने देणार असून सन २०२८-२९ पर्यंत सर्व ८३ विमाने हवाई दलाकडे देण्याचे नियोजन आहे.
एअरो-स्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एअरो इंडिया २०२१ च्या उद्घाटनानंतर हवाई प्रदर्शनामध्ये भारताचे स्वदेशी विमान आणि हेलिकॉप्टर सहभागी झाले. तसेच पाच दिवसीय एरो इंडिया शो मध्ये एक विशेष ‘स्वावलंबन करणारी फ्लाइट’ पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जगभरातील मोठ्या एरोस्पेस कंपन्याही शस्त्रे खरेदी करण्यासाठी भारतात पोहचत आहेत. यामध्ये १४ देशांतील ७८ विदेशी कंपन्यांचा समावेश आहे.
रशियाच्या मदतीने भारतात तयार होणारे सुखोई लढाऊ विमानही आकाशात दिसत आहे. मात्र कोविड-१९ नियमांमुळे, यावेळी सामान्य लोकांना एअरो-शोमध्ये सहभागी होता येत नाही. या शो व्यतिरिक्त भारतीय हवाई दलाच्यावतीने येथे दोन दिवसांच्या हवाई परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध देशांचे हवाई दल भाग घेतील.
(सर्व छायाचित्रे ट्विटरवरुन साभार)