नवी दिल्ली – दररोज हजारो लोकांना फ्रॉड कॉल्स येतात आणि अनेक लोक फसवणुकीला बळीही पडतात. पोलिसांनी मात्र आता सर्वसामान्य जनतेला सतर्क करीत बँकेविषयीच्या आपल्या तक्रारी फेसबुक आणि ट्वीटरच्या माध्यमातून न करण्याचे आवाहन केले आहे. बरेचदा आपण बँकेविरोधातील तक्रारी ट्वीटरवरून करतो. त्यात अकाऊंटनंबर आणि इतर डिटेल्स टाकतो. त्यातूनच पुढे अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
कस्टमर केअर अधिकारी तुमची व्यक्तिगत माहिती सार्वजनिक करू शकतो किंवा फसवणुक करणाऱ्या टोळीला पुरवू शकतो, अशी भिती पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे देशाच्या काही विशिष्ट्य शहरांमध्ये बसलेले ठगच तुमच्या या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. आपण आपला मोबाईल नंबर, इ-मेल आयडी, पत्ता सोशल मिडीयावर टाकणे टाळलेच पाहिजे. अन्यथा केवळ बँक खात्यालाच नाही तर घरालाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यात खात्यातून पैसे गायब होणे तर अगदीच सामान्य बाब ठरते. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने या माहितीच्या माध्यमातून लोकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बँकेविरुद्ध तक्रार करायची असेल किंवा बँकेकडे एखादी माहिती विचारायची असेल तर सोशल मिडीयाएवजी बँकेचा अधिकृत इ-मेल आयडी वापरायला हवा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय तुमची फसवणुक झाली असेल तर रिझर्व्ह बँक आफ इंडियाच्या १४४४० या हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल देऊनही तक्रार करता येणार आहे.
असे परत मिळतील पैसे
एखाद्या खात्यातून कुठलीही सूचना न देता पैसे काढण्यात आले असतील तर तातडीने बँकेला लेखी तक्रार करावी आणि त्याची पावती आपल्याजवळ अवश्य ठेवावी. त्यानंतर तीन दिवसांच्या आत रक्कम परत करण्याची पूर्ण जबाबदारी बँकेची असते.
हे ही महत्त्वाचे
– पासवर्ड नेहमी अल्फा न्युमरिक असावा
– पासवर्ड कुणासोबतही शेअर करू नये
– आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवू नका
– बोगस संकेतस्थळांवर माहिती अपलोड करू नका
– अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
– अनोळखी लोकांना व्हिडीयो कॉल करणे टाळा
– अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका