नवी दिल्ली – अनेक भारतीय लोकांना पैसे बचत करण्याची चांगली सवय असते, त्यासाठी अनेक नागरिक बॅंकेत पैसे ठेवतात. त्याकरिता फिक्स डिपॉझिट (एफडी) हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय मानला जातो. विशेषत: ज्येष्ठ नागरिक सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. याला कारण म्हणजे त्यांना इतर पर्यायांच्या तुलनेने हा सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय वाटतो, परंतु गेल्या दोन वर्षांपासून एफडीवरील व्याजदरात बरीच घट झाली आहे. म्हणूनच काही लोक गुंतवणूकीचे इतर पर्याय शोधत आहेत. अशा काही गुंतवणूकीच्या पर्यायांबद्दल आता आपण जाणून घेऊ या…
१) राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) :
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या माध्यमातून सध्या ग्राहकांना 6.8 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान एक हजार रुपये भरावे लागतात. तसेच 10 वर्षांपेक्षा कमी वयाची अल्पवयीन मुले देखील एनएससी खरेदी करू शकतात. पोस्ट ऑफिस मार्फत बचत योजना एनएससी ही निश्चित उत्पन्न देणारी योजना असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. ज्यांना भांडवलाचे संरक्षण हवे आहे त्यांच्यासाठी ही प्रमाणपत्रे सुरक्षित आणि उपयुक्त आहेत.
२) किसान विकास पत्र (केव्हीपी) :
किसान विकास पत्र याद्वारे सध्या ग्राहकांना 6.9 टक्के व्याज दर देण्यात येत आहे. या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान एक हजार रुपये भरावे लागत आहेत. ही भारतातील चांगली बचत योजना समजली जात आहे. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे जोखीम मुक्त आहे. या योजनेतील गुंतवणूकीला कोणतीही मर्यादा नाही.
३) कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट (कॉर्पोरेट एफडी):
या एफडींमध्ये बँक एफडीपेक्षा जास्त धोका ( जोखीम )असतो. जे जास्त परताव्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास तयार नसतात, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते.
४) वरिष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) :
वरिष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सध्या ग्राहकांना 7.4 टक्के व्याज दर मिळत आहे. या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान एक हजार रुपये लागतात. तसेच 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती एससीएसएसमध्ये गुंतवणूक करू शकते. या योजनेतील गुंतवणूकदार वैयक्तिक किंवा जोडीदाराकडे एकापेक्षा जास्त खाती चालवू शकतो. या योजनेचा मुदतपूर्व कालावधी हा 5 वर्षे आहे. या योजनेत खाते मॅच्युरिटीनंतर तीन वर्षांसाठी वाढू शकते.
५) स्मॉल फायनान्स बँक- एफडी :
स्मॉल फायनान्स बँका मोठ्या बँकांपेक्षा ठेवींवर जास्त व्याज देतात. स्मॉल फायनान्स बँका एफडीमध्ये 8 ते 9 टक्के व्याज देतात. या बँकांच्या एफडीमधील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकेल.