मुंबई – औष्णिक प्लांट पासून निर्मिती होणाऱ्या फ्लाय अँशचा वापरातून सिमेंट, विटा तयार करून त्याचा व्यावसायिक वापर करण्यात यावा असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महानिर्मितीच्या सौर व राख विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे व इतर अधिकारी उपस्थित होते.
औष्णिक वीज निर्मिती केंद्रात येणाऱ्या कोळशाच्या सुमार दर्जामुळे मोठया प्रमाणात अँशची निर्मिती होते. परिणामी मोठया प्रमाणात औष्णिक वीज कंपन्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. हा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी व पर्यावरणादृष्टीकोनातून विचार करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी कोळसा निर्मिती कंपनींना पत्र पाठवावे. तसेच त्याची एक प्रत महाराष्ट्र पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात यावी अशा सूचना डॉ नितीन राऊत यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
अँशचा जास्तीतजास्त व्यावसायिक वापर करता यावा यासाठी सिमेंट कंपन्यांशी चर्चा करून ती त्यांच्यासाठी फायदेशीर कशी आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्यांची गरज ओळखून ती त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच महानिर्मितीने स्वतः अँशपासून विटा तयार करून त्या बाजारात उपलब्ध कराव्यात. रस्त्याच्या बांधकामात मुरूमऐवजी राख कशी फायदेशीर आहे, याचे महत्त्व संबंधित कंपनींना पटवून द्यावे. तसेच याकडे आता गांभीर्याने बघून व्यावसायिक दृष्टीकोनातून मार्ग काढण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमण्यात यावा असे डॉ राऊत यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
दिल्लीत टाटाने लावलेले सौर दिवे आपल्याकडे लावल्यास ते कसे फायदेशीर ठरतील याची माहिती घेण्यात यावी. व्हर्टिकल सोलार प्रकल्प उभारून त्यामधील जागेत शेती करता येऊ शकते का याचा अभ्यास करावा. तसेच बंद झालेल्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या जागेचा वापर सोलार प्रकल्पासाठी करून त्यासाठी रोड मॅप करण्याच्या सूचना डॉ राऊत यांनी यावेळी दिल्या.