पॅरिस – पहिल्याच लाटेच्या धक्क्यातून अद्याप जग सावरलेले नसताना कोरोनाची तिसरी लाट फ्रान्समध्ये धडकल्यामुळे गोंधळ उडाला आहे. त्यामुळे फ्रान्स सरकारने चार आठवड्यांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रो यांनी तीन आठवड्यांसाठी शाळाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लॉकडाऊन केले तरच कोरोनाची दुसरी लाट पळवून लावणे शक्य होईल. अन्यथा तिसऱ्या लाटेचा संपूर्ण देशातील रुग्णालयांवर मोठा भार येईल. कठोर पावले उचलली नाहीत तर कोरोनावर नियंत्रण शक्य होणार नाही, असे मँक्रो यांनी म्हटले आहे.
येत्या शनिवारपासून चार आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू राहतील आणि या कालावधीत सर्व कार्यालयांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रमांवर संपूर्ण बंदी असेल. तसेच कुठल्याही महत्त्वाच्या कामांशिवाय घरापासून १० किलोमीटरपेक्षा अधिक लांब जाण्यावरही बंदी असेल, असे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.
पुढील आठवड्यापासून तीन आठवडे शाळाही बंद राहणार आहेत. केवळ इस्टर फ्रायडेला लोकांना जिथे जायचे असेल तिथे जाता येणार आहे, असे सरकारने म्हटले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या डॅशबोर्डनुसार फ्रान्समध्ये एकूण संक्रमितांची संख्या ४६.४६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर ९५ हजार ५०२ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ५ हजार जण आयसीयूमध्ये आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ३१ मार्चला २९ हजार ५७५ नवे रुग्ण आढळले.
जर्मनीतही परिस्थिती वाईट
जर्मनीतही कोरोनाने चांगलेच बस्तान मांडले आहे. इथे आता आणखी १४ दिवसांचे कठोर लॉकडाऊन घोषित करण्याची तयारी सुरू झाली आहे. जर्मनी सध्या अत्यंत भयंकर फेजमधून जात असल्याची चिंता सरकारने व्यक्त केली आहे.