पॅरिस – जगात कोणत्याच देशात कोरोना महामारीचा अद्याप अंत झालेला नाही. या उलट तीन महिन्यांनंतर फ्रान्समध्ये पुन्हा रूग्ण वाढू लागले आहेत. एका दिवसात ३१ हजाराहून अधिक नवीन रुग्ण प्रकरणे नोंदली गेली. फ्रान्सच्या उत्तर भागात काही ठिकाणी आंशिक लॉकडाउन लादण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये नोव्हेंबरनंतर कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आतापर्यंत येथे ८५ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत आणि एकूण रुग्णांची संख्या ३६ लाखाहून अधिक आहे. फ्रान्सच्या उत्तरेकडील भागातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन दरम्यान लोकांना केवळ आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे. अन्य वेळी मात्र कडक लॉक डाऊन लावण्यात आला आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये एका दिवसात नऊ हजार रूण प्रकरणे समोर येत आहेत. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका देशांमध्ये कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती डॉक्टरांना आहे.
गेल्या २४ तासांत रशियामध्ये ११ हजाराहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोनाची भिती असल्यानंतरही सरकारने १ मार्चपासून सर्व शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे.