पॅरिस : फ्रान्समध्ये माजी राष्ट्रपती निकोलस सारकोझी यांना न्यायाधीशांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाचा हा निर्णय फ्रेंच राजकीय नेतृत्वासाठी मोठा धक्का आहे. सारकोझी यांनी पाच वर्षे फ्रान्सचे प्रमुख म्हणून कार्य केले.
या खटल्याची शिक्षा ठोठावणाऱ्या महिला न्यायाधीशांनी त्यांना तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सरकोझी आपल्या विरोधातील निकालाला मोठ्या न्यायालयात आव्हान देणार असून अन्य न्यायाधीश या अर्जावर निर्णय घेतील. सारकोझी यांच्यासह त्यांचा वकील आणि जुना मित्र थिअरी हर्झोग आणि निवृत्त न्यायाधीश गिलबर्ट इगीबर्ट यांनाही दोषी ठरविण्यात आले आहे. त्या दोघांनाही तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकोझी २००७ ते २०१२ या काळात फ्रान्सचे अध्यक्ष होते. फ्रान्समधील भ्रष्ट वर्तनाबद्दल शिक्षा भोगणारे ते दुसरे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अगोदर माजी राष्ट्रपती जॅक स्यराक यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. विशेष म्हणजे सरकोजी यांच्यावर राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यावर खटला चालविला गेला. त्या प्रकरणात, त्यांनी २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीत देणगी घेतल्याची माहिती दडपण्याच्या बदल्यात मोनाको येथे न्यायाधीशांना चांगली नोकरी देण्याचा प्रस्ताव दिला. सरकोझी यांनी ही देणगी कॉस्मेटिक्स कंपनीच्या मालकाकडून घेतली.