मुंबई – कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता बहुतांश जणांनी ऑनलाईन पेमेंटला पसंती दिली आहे. मात्र, ऑनलाईन पेमेंट अँप्लिकेशनच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आहे. कॅशबॅक कुपनच्या नावाखाली मुली व महिलांना फोन येत असून त्याद्वारे फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. तथापी, अशा कोणत्याही कॅशबॅक कूपनच्या नावे फोन पे कंपनी ग्राहकांना संपर्क साधत नसल्याचे फोनपेच्या व्यवस्थापकीय मंडळाने स्पष्ट केले आहे.
सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना आता ऑनलाईन पेमेंट अँप्लिकेशचे नाव वापरून ग्राहकांना फोन केले जात आहेत. सुरुवातीला १५०० ते २००० रुपयांपर्यंतच्या कॅशबॅक कूपन जिंकल्याची माहिती दिली जाते. संबंधित प्रक्रियेविषयी माहिती विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने मुली व महिलांना यासंदर्भात फोन येत असल्याचे उघड झाले आहे. तसेच फोन न उचलल्यास थेट त्यांच्या व्हाट्सअँप क्रमांकावर मेसेज केले जातात. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली सुरु असलेल्या फसवणुकी विरोधात सायबर क्राईमच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. परिणामी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे फोन पे किंवा तत्सम कोणत्याही ऑनलाईन पेमेंट अँप्लिकेशनच्या नावे येणारे फोन नंबर त्वरित सायबर सेलला कळवावे.