सिमला – फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याचा अर्थ असा नाही की, त्या मुलीला लैंगिक संबंध हवे आहेत. या उलट सर्वांनी हे समजून घेणे आवश्यक आहे, की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मुलीने तिचे स्वातंत्र्य आणि अधिकार त्या युवकाच्या ताब्यात दिलेले नाहीत, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने आपल्या एका केसमध्ये हा निर्णय दिला आहे.
हायकोर्टाने म्हटले आहे की, आजकाल सोशल नेटवर्किंगवर असणे सामान्य बाब आहे. काही लोक हे मनोरंजन, नेटवर्किंग आणि माहितीसाठी सोशल मीडिया साइट्सशी कनेक्ट होतात. आज बहुतेक तरुण – तरुणीसोशल मीडियावर आहेत आणि सक्रिय देखील आहेत. अशा परिस्थितीत, कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे वाईट नाही.
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल आरोपीची जामीन याचिका फेटाळताना न्यायमूर्ती अनूप चित्रकरा यांनी ही टिप्पणी केली आहे. संशयीत आरोपी युवकाने एका युवतीने त्याच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याचा युक्तिवाद केला म्हणून तिचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे, आणि म्हणूनच त्याने तिच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवले, परंतु कोर्टाने हा युक्तिवाद नाकारला. फेसबुक अकाउंट तयार करण्याचे किमान वय १३ वर्षे असल्याचे कोर्टाने निदर्शनास आणले. कोर्टाने असेही म्हटले आहे की, जर मुलीने फेसबुकवर चुकीचे वय नोंदवले असेल तर ते पूर्णपणे योग्य मानले जाऊ नये. अशा परिस्थितीत सदर मुलगी अल्पवयीन असू शकते.