नाशिक – लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला फुलबारात खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या फुलांचे भाव तेजीत आहेत. त्यातच कोरोना महामारीमुळे ग्राहकांवर दरवाढीचे संकट ओढवल्याचे दिसून आले आहे. सर्व प्रकारच्या फुलांचे दर कडाडले आहेत. शेवंतीचे फुल ३०० रुपये किलो तर झेंडूच्या फुलांनी २०० ते ४०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
शहराच्या सर्वच भागात ग्राहकांनी फुले खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने फुलांच्या किंमतीत वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. यंदा प्रथमच झेंडूच्या फुलांचा भाव २०० ते ४०० पार गेल्याने ग्राहकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
सणाच्या निमित्ताने शेवंती, झेंडू, गुलाब, केवडा, चाफा, निशिगंधा आदी फुलांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसते आहे. लॉकडाऊन तसेच अतिवृष्टीमुळे फुल उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी ८० ते १०० रुपये दरम्यान असणारे झेंडूचे फुल यंदा २०० ते ४०० पार गेल्याचे पहायला मिळते आहे.
झेंडूच्या फुलांचा भाव सध्या प्रति कॅरेट ५०० रुपये भाव आहे. तसेच गुलाब २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलाला सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, कोरोनामुळे तसेच काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने साहजिकच त्याचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे.