मुंबई – इराण सरकारने देशात चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. गेल्या चोवीस तासांत शंभर लोकांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अलर्ट करण्यात आले आहे. जानेवारीनंतर मृतांची संख्या प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
फिनलँडमध्येही आणीबाणी
फिनलँडमध्ये कोरोना महामारीमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. इथे परिस्थिती बिघडत चालली आहे, त्यामुळे संसदेत आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला. 8 मार्चपासून तीन आठवडे सर्व रेस्टॉरेंट बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. सोबतच अनेक निर्बंधही घालण्यात आले आहेत.
कोरोना संपलेला नाही – डब्ल्यूएचओ
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे देशातील नागरिकांनी गाफील राहू नये, असे म्हटले आहे. 2021च्या शेवटापर्यंत कोरोना पूर्णपणे संपुष्टात येईल, असे म्हणणे घाईचे ठरेल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
व्हॅक्सीनमुळे मृत्यू कमी होतील
डब्ल्यूएचओच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रियान यांनी म्हटले आहे की सरकारी व्हॅक्सीन आल्यानंतर हॉस्पीटल जाणाऱ्यांची आणि मृत्यूंची संख्या कमी होईल.
242 देशांना 2 कोटी 37 लाख व्हॅक्सीन डोज
जागतिक आरोग्य संघटनेने व्हॅक्सीन वितरण कार्यक्रमात कोव्हॅक्स अंतर्गत 142 देशांमध्ये 2 कोटी 37 लाख व्हॅक्सीनचे डोस वितरित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोन घेबेसस यांनी सांगितले की कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत अंगोल, कंबोडिया, कांगो, नायजेरिया आणि घानामध्ये व्हॅक्सीन वितरित केले गेले आहे.
ब्राझीलमध्ये कर्फ्यूची शक्यता
ब्राझीलमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने लॉकडाऊन आणि कर्फ्यू लावण्याची विनंती सरकारला केली आहे. रुग्णांचे हाल होत आहेत आणि रुग्णालयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. इटलीमध्येही वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे.
भारताने क्षमता सिद्ध केली
डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना महामारीच्या काळात अद्भूत क्षमतेसह काम केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की जागतिक स्तरावर व्हॅक्सीन निर्माण करण्यातही भारताने अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे.
भारतात तीसपेक्षा जास्त व्हॅक्सीन विकसित केले जात आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यातील दोन अर्थात कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्डचा प्रयोग तर सुरू झाला आहे. भारताने इतर देशांमध्येही हे व्हॅक्सीन निर्यात करायला सुरुवात केली आहे.