नवी दिल्ली – केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सर्वात मोठ्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या रनमध्ये धावपटूंना अनोखी संधी निर्माण करुन दिली आहे.
सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचे पालन करून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळीला आणखी बळकट करण्याचा आणि तंदुरुस्तीला आपली जीवनशैली बनवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, असे रिजीजू यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तंदुरुस्त राहणे गरजेचे असल्याने सध्याच्या काळात तर या उपक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे आणि कोविड १९ च्या विरोधात लढा देण्यासाठी ही काळाची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लठ्ठपणा, आळस, ताण, बेचैनी आणि इतर आजारांपासून नागरिकांना मुक्त करणे आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे हे या फ्रीडम रनचे घोषवाक्य आहे. गेल्या काही दिवसात फिट इंडियाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी फिट इंडिया प्लॉग आणि फिट इंडिया सायक्लोथॉन यांसारख्या उपक्रमांचे व्यापक स्तरावर आयोजन केले आहे.
अशी असेल स्पर्धा
धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्या व्यतिरिक्त ते या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात. त्यांनी कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती जीपीएस घड्याळाच्या मदतीने किंवा स्वतः नोंदवता येऊ शकेल. कोविड १९ च्या निकषांचे पालन करतानाच स्वतःला तंदुरुस्त राखण्याबाबत जनतेला प्रोत्साहित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सहभागासाठी हे करा
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना फिट इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. देशाच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आणि महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर या दरम्यान जी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.