नवी दिल्ली – देशाच्या परिवहन क्षेत्रात फास्ट टॅगच्या वापराची परिणामकारक माहिती समोर येत आहे. टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात होणार्या गर्दीतून आता सुटका मिळाली आहे. कार तसेच ट्रकच्या वाहनात साधारणपणे ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सहाजिकच यामुळे पर्यावरणाचे होणारे प्रदूषण कमी झाले आहे.
मुख्य म्हणजे टॅक्समध्ये होणार्या चोर्यांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका वर्षात जवळपास १० हजार ३०० कोटी रुपयांच्या चोरीला प्रतिबंध बसला आहे. १०० टक्के वाहनांच्या क्षमतेसह ऑनलाइन पैसे दिल्यामुळे हा आकडा वाढू शकतो अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
देशात कार आणि मोठ्या व्यावसायिक वाहनांची संख्या २१ कोटीपेक्षा जास्त आहे. यात ७ कोटी ट्रक, बस, कार असून १४ कोटी दुचाकी आहेत. रस्ता परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यानी दिलेल्या महितीनुसार दररोज किमान ७० कोटी रुपयांची टोल वसूली केली जाते. फास्ट टॅग प्रणाली लागू केल्यानंतर दररोज हा आकडा ९० कोटी पर्यंत जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे टोल वसुलीमध्ये २८.५ टक्के वाढ झाली आहे.
यावर्षी ३२,८५० कोटी रुपये टोल जमा होणार असून गेल्यावर्षी हा आकडा २५,५५० कोटी रुपये होता. त्यांनी दिलेल्या महितीनुसार साधारण २ कोटी वाहनांवर फास्ट टॅग स्टीकर लावण्यात आले आहे. सर्व वाहनांवर फास्ट टॅग लावल्यास टोल वसूलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिक वाहनांच्या फेर्या जास्त असल्याचे त्यांना यासुविधेचा फायदा होणार आहे. तसेच, टोल नाक्यावर लांब रांगाही आता राहत नाहीत. त्यामुळे वेळेचीही बचत होत आहे.